
अयोध्येतील राम मंदिर आणि बद्रीनाथ धाम येथील देणग्यांमध्ये झालेल्या गैरव्यवहाराच्या पार्श्वभूमीवर हरिद्वारच्या प्रसिद्ध मनसा देवी मंदिर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मंदिरातील पुजारी आणि कर्मचाऱ्यांना बुधवारी ‘खिशे नसलेले’ (Pocketless) गणवेश देण्यात आले. अखिल भारतीय आखाडा परिषद आणि मनसा देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष महंत रवींद्रपुरी यांनी या नवीन पोशाखांचे वाटप केले.
यावेळी बोलताना ते म्हणाले, “राम मंदिर आणि बद्रीनाथ धाम येथील दानावरून झालेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वीच हा निर्णय घेण्यात आला होता. मंदिरातील पुजाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी आपले कर्तव्य बजावताना खिशे नसलेले कपडेच वापरावेत, जेणेकरून व्यवस्थेत पूर्ण पारदर्शकता राहील.” देशभरात सध्या धार्मिक स्थळांवरील दान आणि देणग्यांच्या व्यवस्थापनामध्ये पारदर्शकता आणण्याबाबत सुरू असलेल्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या नवीन नियमामुळे धार्मिक क्षेत्रातील देणग्यांच्या पारदर्शकतेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.



























































