
मानखुर्दमध्ये बेस्ट बसने डिव्हायडरला जोरदार धडक देत तिथे उभ्या असलेल्या एका व्यक्तीला चिरडले. या अपघातात तीन जण जखमी झाले होते. त्यातील एका 65 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. भास्कर रावसाहेब पांडे असे त्या व्यत्तीचे नाव आहे.
सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास मानखुर्दमध्ये शीव पनवेल महामार्गावर विश्वकर्मा हॉटेलजवळ हा अपघात झाला. अपघाताच्या वेळी भास्कर पांडे हे डिव्हायडरजवळ उभे होते. त्यावेळी भरधाव आलेल्या बेस्ट बसने डिव्हायडरला धडक दिली. या धडकेत भास्कर पांडे यांचा जागीच मृत्यू झाला तर बसचे चालक बनवारी शर्मा (51) आणि बसचे वाहक वैभव वाघमारे (41) हे जखमी झाले आहेत. त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.






























































