
मास्टर लिस्टच्या सोडतीत यापूर्वी विजेता ठरलेल्या मात्र पैशांअभावी घराचा ताबा न घेतलेल्या 25 विजेत्यांना म्हाडाने दिलासा दिला आहे. या विजेत्यांना म्हाडाने घरे बदलून दिली असून बुधवारी म्हाडा मुख्यालयात सोडत पार पडली.
वर्षानुवर्षे संक्रमण शिबिरात राहणाऱया रहिवाशांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाच्या मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळातर्फे मास्टर लिस्ट सोडत काढण्यात येते. म्हाडाने 2024 मध्ये 265 घरांची आणि 2025 मध्ये 100 घरांची संगणकीय सोडत काढली. यात 300 ते 750 चौरस फुटांच्या घरांचा समावेश होता.
सातरस्ता येथे मिळाले हक्काचे घर
तीनशे चौरस फुटाची घरे म्हाडातर्फे विनामूल्य दिली जातात मात्र त्यापेक्षा अधिकच्या क्षेत्रफळासाठी रेडिरेकनरच्या दराने पैसे आकारले जातात. काही विजेत्यांना सोडतीत तीनशेपेक्षा अधिक चौरस फुटांची घरे लागली, पण उर्वरित क्षेत्रफळाचे पैसे भरण्याची क्षमता नसल्यामुळे त्यांनी घराचा ताबा घेण्यास नकार दिला होता. अखेर या रहिवाशांना आता म्हाडाने सातरस्ता येथील नळवाला चाळ येथे 300 चौरस फुटांची घरे उपलब्ध करून दिली आहेत.





























































