
आयपीएलचा संस्थापक ललित मोदी तब्बल 16 वर्षांनंतर हिंदुस्थानात परतण्याच्या तयारीत आहे. आयपीएल 2009चे सामने दक्षिण आफ्रिकेत आयोजित करण्याशी संबंधित परकीय चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) प्रकरणात अपीलीय न्यायाधिकरणाने 16 जुलैला महत्त्वाचा निर्णय देत अंमलबजावणी संचालनालयाने लावलेला दंड रद्द केला आहे. यानंतर हिंदुस्थानात परतण्याचा मार्ग मोकळा झाल्याचे ललित मोदीने सांगितले.
दक्षिण आफ्रिकेत निधी पाठवण्यावरून वाद
2009 मध्ये स्पर्धेच्या आयोजनासाठी बीसीसीआयने सुमारे 243.45 कोटी रुपये दक्षिण आफ्रिकेत पाठवले होते. ईडीने नंतर आरोप केला की, इंडियन रिझर्व्ह बँकेची पूर्वपरवानगी न घेता ही रक्कम परदेशात पाठवली, त्यामुळे ‘फेमा’ कायद्याचे उल्लंघन झाले. या प्रकरणात ईडीने 2011 मध्ये नोटीस बजावली आणि 2018 मध्ये ललित मोदीला दंड ठोठावला होता.




























































