
‘टीईटी घोटाळा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात झाल्याचा आरोप करणारे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आधी पुरेशी माहिती घ्यावी आणि मगच आरोप करावेत,’ अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब – ठाकरे) पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांवर पलटवार केला आहे. – हा घोटाळा ठाकरे सरकारच्या काळातला नसून, तो २०१८ मध्ये फडणवीस मुख्यमंत्री आणि विनोद तावडे शिक्षणमंत्री असताना झाला होता. उद्धव ठाकरे सरकारने हा – घोटाळा उघडकीस आणून गुन्हेगारांना – तुरुंगात टाकले होते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी टीईटी घोटाळ्यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले होते. या आरोपांचा समाचार घेत अंधारे यांनी पत्रकार परिषदेत पुराव्यांसह शिंदे-फडणवीस सरकारला धारेवर धरले. पेपरफुटी घोटाळ्यात ज्या प्रीतीश देशमुख या कंत्राटदाराचे नाव आले, त्याला परीक्षा भरतीचे कंत्राट तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या कार्यकाळातच मिळाले होते, असेही अंधारे म्हणाल्या.
या घोटाळ्याचा तांत्रिक सल्लागार अभिषेक सावडीकर याला ठाकरे सरकारनेच जेलमध्ये टाकले. एवढेच नव्हे तर, शिक्षण परिषदेचे तत्कालीन आयुक्त तुकाराम सुपे आणि याच गैरव्यवहाराच्या लिंकमधून शिक्षण विभागाचे उपसचिव व आयएएस अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्याची हिंमतही केवळ ठाकरे सरकारनेच दाखवली होती.
अंधारे म्हणाल्या, ‘फडणवीस साहेब, ज्या अभिषेक सावडीकरला ठाकरे सरकारने पेपरफुटी प्रकरणात जेलमध्ये सडवले, त्याला तुम्ही भाजपमध्ये प्रवेश देऊन पावन करून घेतलेत. तोच सावडीकर आज पुन्हा एका नवीन भरती घोटाळ्यात अडकल्याचे समोर आले आहे.’ त्यापुढे जात त्यांनी अधिकाऱ्यांच्या बदल्यांवरूनही सरकारला घेरले. ज्या डॅशिंग आणि प्रामाणिक महिला आयपीएस अधिकारी भाग्यश्री नवटके यांनी हे तिन्ही परीक्षा घोटाळे अत्यंत धैर्याने उघडकीस आणले, त्यांना तुम्ही शिक्षा म्हणून साईड पोस्टिंगला टाकून दिले. दुसरीकडे, ज्या भ्रष्ट आयएएस अधिकारी सुशील खोडवेकरला ठाकरे सरकारने अटक केली होती, तो सुशील खोडवेकर आज उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या खात्यात महत्त्वाच्या पदावर रुजू झाला आहे.
अंधारे म्हणाल्या की, देशातील विद्यार्थी महिनाभरापासून रस्त्यावर आंदोलनाला बसले आहेत. मात्र, पंतप्रधानांनी त्याची साधी दखलही घेतली नाही. आता आंदोलन तीव्र झाल्यानंतर मोदींनी केवळ एक व्हिडीओ जारी करून कारवाईची माहिती दिली; पण इतके दिवस तुम्ही गप्प का होता?





























































