
‘नीट’प्रमाणे महाराष्ट्रातील ‘एमएचटी सीईटी’ परीक्षेतही प्रचंड गोंधळ होत आहे. मागील काही वर्षांपासून या परीक्षेतही अनागोंदी प्रकार सुरू आहे. या सर्व घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने राज्य सरकारकडे केली आहे.
एमएचटी सीईटी 2026 च्या परीक्षेच्या निकालाबाबत हजारो विद्यार्थी आणि पालकांच्या मनात शंका आहेत. 10 वी 12 वी 40-50 टक्के मार्क मिळालेल्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी परिक्षेत मात्र 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल पडले आहेत. 2026 च्या निकालात तर एका जुळ्या भावंडांना जुळा निकाल लागला आहे. दोघांना मार्क सारखे आहेत. बारावीला 60 टक्के मार्क्स पडलेल्या विद्यार्थ्यांना सीईटीमध्ये 99 पर्सेंटाईल पडले आहेत. ही बाब सीईटी सेलच्या निदर्शनास आणून दिली असता हा योगायोग आहे, असे उडावाउडवीचे उत्तर दिले आहे. त्यामुळे या सर्व घोटाळ्याची निवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेस सचिव सचिन सावंत यांनी केली आहे.
























































