
म्हाडाच्या घराचे हस्तांतरण (ट्रान्सफर ऑफ टेनन्सी) करण्याच्या प्रक्रियेला आता वेग येणार असून केवळ पंधरा दिवसांत हस्तांतरण होणार आहे. लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होणार असून यामुळे सर्वसामान्यांना दिलासा मिळणार आहे. यापूर्वी हस्तांरणासाठी 23 दिवसांचा कालावधी लागत होता. मुंबई शहरासह उपनगरात म्हाडाच्या अनेक इमारती आहेत. एखाद्याने मूळ मालकाकडून घर खरेदी करून त्याबाबतचा नोंदणीकृत खरेदी खत केल्यानंतर म्हाडाच्या दफ्तरी त्याची नोंद करावी लागते. गाळे हस्तांतरणासाठी म्हाडाकडे रीतसर अर्ज करावा लागतो. त्यानुसार म्हाडाच्या दफ्तरी नवीन खरेदीदाराचे नाव लावले जाते. यासाठी म्हाडाकडे ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्यावर 23 दिवसांत निर्णय घेतला जातो. मात्र, या प्रक्रियेला वेग देण्यासाठी हा कालावधी आता केवळ 15 दिवसांवर आणला जाणार आहे.




























































