
महाबळेश्वर शहर आणि संपूर्ण परिसरात मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला असून, पावसाने आता ‘दीडशतका’कडे वाटचाल सुरू केली आहे. गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाचा जोर कमालीचा वाढल्यामुळे तालुक्यातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. या पावसामुळे तापोळा भागाकडे जाणारा रस्ता खचला. 105हून अधिक दुर्गम व अतिदुर्गम गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे.
यंदा जूनचा पहिला पंधरवडा कोरडा गेल्यानंतर जुलैच्या पहिल्या आठवडय़ापासून पावसाने उग्ररूप धारण केले. 1 जून ते 9 जुलै यादरम्यान अवघा 470.28 मि.मी. (18.52 इंच) पाऊस झाला होता. मात्र, जुलैच्या पहिल्याच आठवडय़ात सहा दिवसांत 50 इंच आणि दुसऱया आठवडय़ात 95 इंच पावसाची नोंद झाली. अवघ्या तीन आठवडय़ांत 100 इंचांचा टप्पा ओलांडल्यानंतर आता दररोज 3 ते 4 इंच पाऊस कोसळत आहे. प्रशासकीय नोंदीनुसार महाबळेश्वरमध्ये आतापर्यंत 140.14 इंच (3559.28 मि.मी.) पाऊस झाला असून, हाच जोर कायम राहिल्यास 150 इंचांचा टप्पा लवकरच पार होईल.
मुसळधार पावसामुळे शहरापासून 1 कि.मी. अंतरावर नगरपालिका हद्दीतील फळणेवस्तीनजीक तापोळ्याकडे जाणारा मुख्य रस्ता पूर्णपणे खचला आहे. मागील आठवडय़ात रस्ता खचल्यानंतर पालिकेने केवळ खडी-मुरूम टाकून आणि बॅरिकेड्स लावून तात्पुरती मलमपट्टी केली होती; परंतु आता हा रस्ता पूर्णपणे खचल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.
याशिवाय ग्लेन ओगल धरणावरील तापोळा रस्त्यावरील एकमेव पूलही अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला आहे. दरवर्षी रस्ता खचणे व पुलाची दुरवस्था याकडे पालिका प्रशासनाचे कायमस्वरूपी उपाययोजना करण्याबाबत दुर्लक्ष होत असल्याचा आरोप होत आहे. तापोळा भागाकडे जाणारा हा एकमेव मुख्य रस्ता बंद झाल्याने 105हून अधिक दुर्गम व अतिदुर्गम गावांचा शहराशी असलेला संपर्क तुटला आहे. उन्हाळ्यात खड्डे आणि धुळीचा सामना करणाऱया नागरिकांना आता पावसाळ्यात जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
केळघर घाट मोठय़ा वाहनांसाठी अद्यापि बंद
जावळी आणि महाबळेश्वर तालुक्याला जोडणाऱया केळघर घाटात मुसळधार पावसामुळे मोठी दरड कोसळली. डोंगरकडा रस्त्यावर आल्याने सातारा-मेढामार्गे महाबळेश्वरला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. प्रशासनाने 15 तासांच्या अथक प्रयत्नांनंतर हा रस्ता हलक्या वाहनांसाठी मोकळा केला असला, तरी मोठय़ा वाहनांसाठी हा मार्ग अजूनही बंद ठेवण्यात आला आहे.




























































