CWG 2026 – हिंदुस्थानला दुहेरी रौप्य; धावपटू गुलवीर, वेटलिफ्टर हरजिंदर यांची दमदार कामगिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आशियाई विजेत्या गुलवीर सिंगने पुरुषांच्या 10 हजार मीटर शर्यतीत इतिहास रचत रौप्यपदकाची कमाई करत राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील बुधवारचा दिवस गाजविला. या प्रकारात राष्ट्रकुल स्पर्धेच्या इतिहासात पदक जिंकणारा तो पहिलाच हिंदुस्थानी धावपटू ठरला, हे विशेष. याचबरोबर वेटलिफ्टिंगमध्येही हरजिंदर कौरने रूपेरी यश संपादन करून या खेळातील हिंदुस्थानी वर्चस्व आजही कायम ठेवले.

स्कॉटस्टाऊन स्टेडियमवर झालेल्या शर्यतीत हिंदुस्थानच्या गुलवीर सिंगने 27 मिनिटे 49.78 सेकंद अशी वेळ नोंदवत ऑस्ट्रेलियाच्या काई रॉबिन्सननंतर दुसरे स्थान पटकावले. वेटलिफ्टिंगमध्येही हिंदुस्थानची घोडदौड सुरूच असून, आज हरजिंदर कौर हिने महिलांच्या 69 किलो गटात एकूण 227 किलो वजन उचलत रौप्यपदक आपल्या नावावर केले. बार्ंमगहॅम 2022 मध्ये कांस्यपदक जिंकलेल्या हरजिंदरने सलग दुसऱया राष्ट्रकुल स्पर्धेत पदक जिंकण्याचा पराक्रम केला. ग्लासगोमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत हिंदुस्थानच्या आठ वेटलिफ्टरमध्ये हिंदुस्थानचे हे सातवे पदक ठरले आहे. बुधवारच्या दुहेरी यशामुळे हिंदुस्थानच्या खात्यात आता 2 सुवर्ण, 7 रौप्य आणि 3 कांस्य अशी एकूण 12 पदकांची भर पडली आहे.

अरुंधती, साक्षीची उपांत्य फेरीत धडक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत हिंदुस्थानी बॉक्सर्संनी प्रतिस्पर्ध्यांना अक्षरशः लोळवत पदकांवर मजबूत पकड मिळविली आहे. बुधवारी सहाव्या दिवशी अरुंधती चौधरी आणि साक्षी चौधरी यांनी उपांत्य फेरीत धडक मारत हिंदुस्थानसाठी आणखी दोन पदके निश्चित केली. यामुळे बॉक्सिंगमध्ये हिंदुस्थानची सहा पदके निश्चित झाली असून, आता फक्त पदकाचा रंग कोणता याकडे तमाम देशवासीयांच्या नजरा लागल्या आहेत.

महिलांच्या 70 किलो गटात अरुंधतीने न्यूझीलंडच्या मॉर्गन अँडरसन हिला 3-1 अशा फरकाने पराभूत केले. 51 किलो गटात साक्षी चौधरीने उत्तर आयर्लंडच्या कॅथलीन फ्रेयर हिच्यावर 5-0 असा एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरी गाठली. यापूर्वीच लव्हलिना बोर्गोहेन (75 किलो), प्रीती पवार (54 किलो), प्रिया घंघास (60 किलो) आणि जादुमणी सिंग (पुरुष 55 किलो) यांनी उपांत्य फेरी गाठून किमान कांस्यपदक निश्चित केले होते. आता हिंदुस्थानी बॉक्सिंग संघाच्या नजरा सुवर्णपदकांवर खिळल्या आहेत.

गोळाफेकीत तजिंदर, समरदीप अंतिम फेरीत

ऍथलेटिक्समध्येही हिंदुस्थानची दमदार कामगिरी कायम राहिली. गोळाफेकपटू तजिंदरपाल सिंग तूर आणि समरदीप सिंग गिल यांनी अंतिम फेरीत धडक मारली. पात्रता फेरीत तूरने दुसऱयाच प्रयत्नात 20.14 मीटर अंतर गाठत थेट अंतिम फेरीचे तिकीट मिळवले. पहिल्या प्रयत्नात त्याने 19.93 मीटर अंतर पार केले होते. दुसरीकडे, समरदीप गिलने पहिल्याच प्रयत्नात 19.95 मीटर अंतर फेकून प्रभावी सुरुवात केली. दुसरा प्रयत्न 19.75 मीटर तर तिसरा प्रयत्न फाऊल ठरला. एकूण 15 खेळाडूंमध्ये तो पाचव्या स्थानावर राहिला आणि अंतिम फेरीत प्रवेश निश्चित केला. गुरुवारी होणाऱया अंतिम फेरीत दोघांकडून पदकाची अपेक्षा आहे.

अंकुश यादव उपांत्य फेरीत दाखल

हिंदुस्थानी बॉक्सर अंकुश यादवने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीच्या दुसऱया फेरीत सेशेल्सच्या जेड मायकॉकचा 5-0 असा पूर्णपणे पराभव करून आपले वर्चस्व कायम ठेवले. सामन्यावर पूर्णपणे नियंत्रण मिळवून अंकुशने उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. या विजयामुळे ग्लासगोमध्ये भारताला आणखी एक
बॉक्सिंग पदक मिळाले आहे.

सचिन सिवाचचे पदक निश्चित

हिंदुस्थानी बॉक्सर सचिन सिवाचने पुरुषांच्या 60 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत बोत्सवानाच्या ट्रेझर मोरेमीचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून दमदार कामगिरी केली. या एकतर्फी विजयासह सचिनने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले आहे. त्यामुळे आता हिंदुस्थानसाठी आणखी एक बॉक्सिंग पदक निश्चित झाले आहे.

नरेंद्र बेरवाल विजयी

पुरुषांच्या 90 किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व फेरीत नरेंद्र बेरवालने सामोआच्या मायकल सेकोला 3-2 अशा विभाजित निर्णयाने पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्याने तिसरा राऊंड 5-0 ने जिंकून एक जबरदस्त विजय नोंदवला. या विजयामुळे नरेंद्रने उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित केले.