भिवंडीमध्ये चार मजली इमारत कोसळली; आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढले, 3 गंभीर जखमी, ढिगाऱ्याखाली अनेक जण अडकल्याची भीती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भिवंडीमध्ये गुरुवारी मध्यरात्री भीषण दुर्घटना घडली आहे. भंडारी कम्पाउंडमधील गंगारामवाडी येथील ‘कोहिनूर अपार्टमेंट’च्या ‘बी-विंग’चा काही भाग अचानक कोसळला. यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून आतापर्यंत 5 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, तर तीन जण गंभीर जखमी आहेत. अजूनही काही जण ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल, ठाणे आपत्ती प्रतिसाद दल, अग्निशामक दल, स्थानिक पोलीस आणि भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेच्या पथकाकडून रात्रभर मदत आणि बचाव कार्य सुरू होते. अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके अथक प्रयत्न करत आहेत.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री साडे अकराच्या सुमारास मोठा आवाज झाला आणि चार मजली इमारतीचा काही भाग कोसळला. अचानक झालेल्या या दुर्घटनेमुळे नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. यावेळी शेजारील ‘ए-विंग’मधील रहिवाशांनी वेळेवर बाहेर पडून स्वतःचा जीव वाचवला. स्थानिक रहिवाशांनी तातडीने पोलीस आणि पालिका प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर आपत्कालीन पथके घटनास्थळी दाखल झाली आणि तात्काळ शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्यात आली. ढिगारा हटवण्याचे काम रात्रभर सुरू होते. मात्र, रिमझिम पाऊस, अरुंद रस्ते यामुळे बचाव कार्यात अडचणी येत आहेत.

बचाव कार्यात लागलेल्या पथकांनी ढिगाऱ्याखालून पाच जणांचे जणांचे मृतदेह बाहेर काढले आहेत. मृत व्यक्तींची ओळख अजून पटलेली नाही. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असल्याने शोध मोहीम अजूनही सुरू आहे. ‘पीटीआय’ने याबाबत वृत्त दिले आहे.

दरम्यान, इमारतीचा पिलर दुरुस्त करण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती मिळतेय. मात्र यास अद्याप दुजोरा मिळालेला नाही. तसेच या इमारतीला 22 एप्रिल 2026 रोजी स्ट्रक्चरल ऑडिटची नोटीस बजावण्यात आली होती आणि तिला C-2A श्रेणीत टाकण्यात आले होते, अशी माहिती महापालिकेच्या सूत्रांनी दिली आहे. 2013 मध्ये बांधलेल्या या इमारतीवर सुमारे 42 लाख रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असल्याचेही समोर आले आहे.

पहिल्या मजल्यावरून मारली उडी; दोन रहिवासी जखमी

इमारत कोसळत असल्याचे लक्षात येताच अभय कुमार यादव आणि दीपक कुमार जगदीश यादव या दोन रहिवाशांनी थेट पहिल्या मजल्यावरून खाली उड्या मारल्या. यात दोघांचेही पाय फ्रॅक्चर झाले आहेत. तसेच संगीता प्रजापती या महिलाही या घटनेत जखमी झाल्या आहेत. या तिघांवर भिवंडीतील आयजीएम उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ‘फ्री प्रेस‘ने याबाबत वृत्त दिले आहे.