अजिंक्य रहाणेने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला, तरी BCCI त्याला दरमहा पैसे देणार, पण किती?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानचा अनुभवी फलंदाज आणि परदेशात संघाचा खरा शिलेदार राहिलेला अजिंक्य रहाणे याने 30 जुलै रोजी आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम दिला. सोशल मीडियावर एक भावुक व्हिडीओ शेअर करत त्याने आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेमधून निवृत्त होत असल्याच जाहीर केलं. ऑस्ट्रेलियातील 2020-21 मधील ऐतिहासिक बॉर्डर-गावस्कर मालिका विजयात कर्णधाराची भूमिका बजावणारा रहाणे क्रिकेट विश्वातील अत्यंत सन्माननीय खेळाडू म्हणून निवृत्त झाला आहे. या नव्या टप्प्यावर असताना, बीसीसीआयच्या माध्यमातून त्याला आर्थिक आधार मिळणार आहे.

BCCI च्या माध्यमातून अजिंक्य रहाणेला दरमहा 70,000 रुपये निश्चित पेन्शन मिळणार आहे. टीम इंडियाकडून 85 कसोटी सामने खेळलेला रहाणे सर्वोच्च श्रेणीत मोडतो. बीसीसीआयने माजी क्रिकेटपटूंच्या पेन्शनमध्ये वाढ करताना हा निर्णय घेतला होता, ज्यानुसार पूर्वी 50,000 रुपये मिळणारी पेन्शन वाढवून 70,000 रुपये करण्यात आली. ही वाढ सौरव गांगुली बीसीसीआय अध्यक्ष असताना लागू करण्यात आली होती.

टीम इंडियासाठी 85 कसोटी, 90 एकदिवसीय आणि 20 टी-20 सामने खेळणाऱ्या रहाणेने अद्याप आपल्या भविष्यातील वाटचालीबद्दल स्पष्ट केलेले नाही, मात्र नवीन पिढीच्या क्रिकेटपटूंना मार्गदर्शन करण्यास उत्सुक असल्याचे त्याने सुचवले आहे. दरम्यान, जोपर्यंत तो बीसीसीआयमध्ये कोणतीही अधिकृत भूमिका स्वीकारत नाही, तोपर्यंतच ही पेन्शन चालू राहील. जर त्याने भविष्यात BCCI सोबत प्रशिक्षक किंवा प्रशासक म्हणून काम स्वीकारले, तर त्याला मिळणारा पगार पाहता ही पेन्शन तात्पुरती थांबवली जाईल.