‘एमपीएससी’कडून ऑनलाईन परीक्षेच्या निर्णयाला स्थगिती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मोठा दिलासा दिला आहे. आयोगाने परीक्षा पद्धतीमध्ये महत्त्वाचे बदल करत पुढील वर्षीपासून परीक्षा ऑनलाईन घेण्याचे जाहीर केले होते. मात्र ऑनलाईन परीक्षा तूर्त रद्द करण्यात आल्या आहेत.

सध्या महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या तिन्ही परीक्षा वर्षातून केवळ एकदाच घेतल्या जातात. मात्र आयोगाने या परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला होता. पेन पेपर पद्धतीऐवजी ऑनलाईन परीक्षा घेण्याचेही जाहीर करण्यात आले होते. त्यावर अनेक आक्षेप घेण्यात आले होते. त्यामुळे आता आयोगाने त्यात बदल केले असून याबाबत एक प्रसिद्धीपत्रक काढले आहे.