फोटो माॅर्फ केल्याप्रकरणी अभिनेत्री मृणाल ठाकूरचा संताप, कायदेशीर कारवाईचा दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अभिनेत्री मृणाल ठाकूरने एआय (AI) वापरून तयार केल्या जात असलेल्या डीपफेक फोटो आणि व्हिडिओंवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तिने याला बेकायदेशीर आणि अस्वीकार्य म्हटले असून कायदेशीर कारवाईचा इशाराही दिला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) गैरवापर ही जगभरात एक वाढती चिंता बनत आहे. विशेषतः सेलिब्रिटी डीपफेक फोटो, मॉर्फ केलेले व्हिडिओ गैरवापराचे बळी ठरत आहेत. अनेक कलाकारांनी अशा प्रकरणांमध्ये न्यायालयात धाव घेतली आहे. आता या यादीत अभिनेत्री मृणाल ठाकूर यांच्या नावाचीही भर पडली आहे. सोशल मीडियावर डीपफेक कंटेंट तयार करणाऱ्या आणि शेअर करणाऱ्यांना तिने कडक इशारा दिला आहे.

 

मृणाल ठाकूरने मंगळवारी तिच्या सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करून, एआय (AI) द्वारे तयार केलेल्या डीपफेक कंटेंटच्या वापरावर नाराजी व्यक्त केली. तिने म्हटले आहे की, परवानगीशिवाय कोणाचीही ओळख अशा प्रकारे वापरणे बेकायदेशीर आणि पूर्णपणे अस्वीकार्य आहे. अभिनेत्रीने कायदेशीर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे. असे वृत्त टीव्ही 9 ने दिले आहे.

 

मृणाल ठाकूरने स्पष्टपणे सांगितले की, ती असे वर्तन सहन करणार नाही. तिने तिच्या पोस्टमध्ये लिहिले, “माझ्या ओळखीचा वापर करून डीपफेक सामग्री तयार करणे किंवा शेअर करणे बेकायदेशीर आणि अस्वीकार्य आहे. हा माझा औपचारिक इशारा आहे आणि कृपया हे तात्काळ थांबवा. जर माझ्या ओळखीचा पुढे गैरवापर केला गेला, तर कायदेशीर कारवाई केली जाईल.”

 

अलीकडेच, अक्षय कुमार, वरुण धवन, अनिल कपूर, शिल्पा शेट्टी, प्रिती झिंटा, कार्तिक आर्यन आणि सुनील शेट्टी यांच्यासह अनेक कलाकारांनी त्यांच्या प्रतिमा, आवाज अनधिकृत वापराविरोधात न्यायालयात धाव घेतली आहे. हिंदुस्थानात डीपफेकबद्दलचा सर्वात मोठा वाद तेव्हा सुरू झाला, जेव्हा रश्मिका मंदानाचा एक मॉर्फ केलेला व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यावेळी, त्या अभिनेत्रीने हा एक खूप भीतीदायक अनुभव असल्याचे वर्णन केले होते. त्यांनी जनतेला आणि संबंधित अधिकाऱ्यांना हे प्रकरण गांभीर्याने घेऊन त्यावर कठोर कारवाई करण्याचे आवाहनही केले.