
प्रेमसंबंधांमुळे कुटुंबाची बदनामी होईल, यातून अल्पवयीन जन्मदाती मुलीची हत्या करून तिचा मृतदेह जाळत पुरावा नष्ट केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालयाने आई, वडील आणि आजीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश एस. बी. कचरे यांनी हा निकाल देताना आरोपी साईनाथ दिनकर गरड, छाया साईनाथ गरड आणि पद्मावती दिनकर गरड (रा. शेकटे बुद्रुक, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर) यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. या प्रकरणातील एक आरोपी असलेल्या मामाची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली.
7 ऑक्टोबर 2022 रोजी रात्री शेकटे बुद्रुक येथे आरोपींनी संगनमत करून अल्पवयीन मुलीची हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरासमोर जाळून अंत्यसंस्कार करण्यात आले आणि राखही हटवून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता. तपासादरम्यान मृत मुलगी आणि फिर्यादी युवक यांच्यात प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. या संबंधांना आरोपींचा विरोध होता. फिर्यादीला मुलीपासून दूर राहण्याची धमकी देण्यात आली होती. तसेच मुलीनेही आई-वडील व नातेवाईकांकडून जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याची माहिती फिर्यादीला दिल्याचा दावा न्यायालयात करण्यात आला.
घटनेनंतर आरोपींकडून मुलीने विषप्राशन करून आत्महत्या केल्याचा बचाव करण्यात आला. मात्र, सरकारी पक्षाने सादर केलेल्या साक्षी, परिस्थितीजन्य पुरावे आणि युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयाने हा बचाव फेटाळून लावत आरोपींना दोषी ठरविले.
या खटल्यात एकूण 13 साक्षीदार तपासण्यात आले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता ऍड. अनिल देवराम ढगे यांनी कामकाज पाहिले. हा खटला जिल्हा सरकारी वकील ऍड. सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालविण्यात आला.



























































