सागरी हद्दीत घुसखोरी; 9 ड्रोनची करडी नजर, मासळीवर दरोडा टाकणाऱ्या परप्रांतीय मच्छीमारांची खैर नाही, कोस्ट गार्डचीही घेणार मदत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
प्रातिनिधिक फोटो

महाराष्ट्राच्या १२ नॉटिकल सागरी हद्दीत घुसखोरी करणाऱ्या परराज्यांतील मच्छीमार बोटींवर आता ९ ड्रोनची करडी नजर असणार आहे. यासाठी कोस्टगार्डचीदेखील मदत घेतली जाणार असून २४ तास डोळ्यांत तेल घालून घुसखोरांवर वॉच ठेवणार आहे. मत्स्य विभागाचे उपायुक्त नवनाथ भदुले यांनी याबाबत माहिती दिली. दरम्यान, सरकारने केवळ घोषणा न करता महाराष्ट्राचा समुद्र खरवडून ल ाखो टन मासळीवर दरोडा टाकणाऱ्या घुसखोरांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी यावर्षी १५ ऑगस्टपर्यंत वाढविण्यात आला आहे. मत्स्य उत्पादनवाढीसाठी हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र असे असले तरी मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी एक ऑगस्टपासूनच १२ नॉटिकल सागरी मैलाच्या बाहेर अॅक्सेस पासधारक मच्छीमार बोटींना मासेमारीला परवानगी देण्याची घोषणा केल्याने सरकारच्या या दुटप्पी भूमिकेमुळे मच्छीमार संतप्त झाले आहेत.

१२ नॉटिकल सागरी मैलाच्या बाहेर अॅक्सेस पासधारक मच्छीमार बोटींना परवानगी दिल्याने गोवा, कर्नाटक, केरळ, तामीळनाडू आदी परराज्यांतील मच्छीमार बोटी महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत घुसखोरी करून मासेमारी करण्याची भीती मच्छीमारांकडून व्यक्त केली आहे. दरम्यान, टीकेची ही झोड उठल्यानंतर मत्स्य विभागाचे उपायुक्त नवनाथ भदुले यांनी परराज्यांतील घुसखोरी रोखण्यासाठी ९ ड्रोनची करडी नजर ठेवली जाणार आहे.

नितेश राणेंना मंत्रिमंडळातून बडतर्फ करा

मस्त्यवाढीसाठी एकीकडे सरकारने १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी करण्यास बंदी घातली आहे. तर दुसरीकडे १२ नॉटिकल क्षेत्राबाहेर परराज्यांतील मच्छीमारांना परवानगी दिली आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष लिओ कोलासो, कार्याध्यक्ष रामकृष्ण तांडेल, सरचिटणीस किरण कोळी यांनी पारंपरिक मच्छीमारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला असल्याचा आरोप केला आहे. तसेच याप्रकरणी मुख्यमंत्र्यांनीच हस्तक्षेप करून मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ करावे, अशी मागणी केली आहे.