मासेमारी सुरू; म्हावरं स्वस्त! बोंबील, कोळंबी, मांदेलीची बोहनी, खवय्यांची चंगळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

दर्यावरी रे तरली होडी.., मी डोलकर.. डोलकर.. डोलकर दर्याचा राजा.. अशी गाणी गुणगुणत नव्या जोमाने मासेमारी सुरू झाली आहे. त्यामुळे म्हावरं स्वस्त झाले असून बोंबील, कोळंबी, मांदेलीची बोहनीदेखील चांगली होत आहे. बाजारपेठेत या म्हाक्ऱ्यांना चांगली मागणी असून खवय्यांचीदेखील चंगळ होत आहे. खानावळ, हॉटेल्समध्येदेखील आता म्हाक्ऱ्याला मागणी वाढू लागली आहे. मासेमारी पुन्हा सुरू झाल्याने मच्छीमारांच्या खिशात चार पैसे खुळखुळू लागले आहेत.

सरकारी आदेशानुसार १ जून ते ३१ जुलै या कालावधीत खोल समुद्रात मासेमारी करण्यासाठी यांत्रिकी नौकांना बंदी घालण्यात आली होती. फक्त खाडीकिनारी व समुद्र किनाऱ्यावर बिगर यांत्रिकी नौकांनाच मासेमारीची परवानगी होती. त्यामुळे बाजारपेठेत काही दिवस आवक कमी झाली. चिवणी, कोळंबी, मांदेली यांसारख्या माशांना मागणी अधिक होती. पण आवक काहीशी कमी झाल्याने दर वाढले होते. मात्र आता १ ऑगस्टपासून मासेमारीवरील बंदी संपल्याने मच्छीमार व खवय्यांनाही मोठा दिलासा मिळाला आहे.

सध्याचे मासळीचे दर

  • बोंबील – १०० रुपये वाटा.
  • कोळंबी – १०० ते २०० रुपये वाटा.
  • मांदेली – ५० ते १०० रुपये वाटा.

नौकामालकांना प्रतीक्षा खुलाशांची

३१ जुलै रोजी मासेमारीवरील बंदी संपली असून मच्छीमारांनी मासेमारीला सुरुवातही केली आहे. मात्र सध्या फक्त ४० टक्के नौकाच मासेमारीसाठी समुद्रात रवाना होत आहेत. उर्वरित नौकामालकांसमोर खलाशांचा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगडमध्ये उत्तर प्रदेश, बिहार तसेच छत्तीसगड या राज्यातील खलाशी मोठ्या प्रमाणात नौकांवर खलाशांचे काम करतात. बंदी कालावधीत हे खलाशी आपापल्या गावी परतले आहेत. अद्याप ते गावाहून परत न आल्याने नौकामालक खलाशांची प्रतीक्षा करत आहेत.

  • पावसाने काहीशी विश्रांती घेतली असून सध्या बोंबील, कोळंबी, मांदेली या जातीची मासळी मोठ्या प्रमाणात जाळ्यात मिळू लागली आहे. त्यामुळे दर खवय्यांच्या आवाक्यात आले आहेत.
  • मासेमारी बंदी संपल्याने आम्ही मासेमारीला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप पावसाळ्याचा मोसम संपला नसल्याने आम्ही दूरवर जाऊन मासेमारी करत नाही, असे प्रदीप नाखवा यांनी सांगितले.
  • मासेमारी बंदीच्या कालावधीत नौकांची डागडुजी, जाळे विणण्याचे काम पूर्ण करण्यात आले. आता आम्ही मासेमारीला सुरुवात केली आहे. समुद्रात बोंबील हा मासा सध्या मोठ्या प्रमाणात सापडत असल्याचे मारुती खंडाळकर या मच्छीमाराने स्पष्ट केले.