तिसऱ्या मुंबईसाठी 324 चौ. किमीचा ‘मास्टर प्लॅन’, सिंगापूरच्या कंपनीकडून 1.1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

‘थर्ड मुंबई’ म्हणजेच तिसऱ्या मुंबईच्या नियोजित विकासासाठी तब्बल ३२४ चौरस किलोमीटर क्षेत्राचा सर्वसमावेशक ‘मास्टर प्लॅन’ राज्य शासनाने निश्चित केला आहे. त्यासाठी सिंगापूरची ‘मॅपलट्री’ ही कंपनी रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये सुमारे १.१ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार आहे.

यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए (MMRDA), टेमासेक सुरबाना जुरँग आणि मॅपलट्री यांच्यात सामंजस्य करार झाला. तिसऱ्या मुंबईच्या नियोजित विकासासाठी जानेवारीत स्वित्झर्लंडमधील दाव्होस येथे झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’दरम्यान सुरबाना ज्युरँग आणि एमएमआरडीए यांच्यात प्राथमिक पातळीवर सामंजस्य करार करण्यात आला होता.

रायगड-पेण ग्रोथ सेंटरमध्ये १०० एकरांचा विकास प्रकल्प

रायगड पेण ग्रोथ सेंटर लिमिटेड आणि मॅपलट्री यांच्यात १०० एकरांच्या मिक्स-युज विकास प्रकल्पासाठी करार झाला आहे. या प्रकल्पामध्ये मॅपलट्रीकडून भांडवली गुंतवणूक, मूल्यनिर्मिती तसेच जागतिक कंपन्यांना आकर्षित करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. कंपनीने सुरबाना ज्युरँग यांची प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार म्हणून नियुक्ती केली आहे.