Nanded News – अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला विरोध करण्यासाठी नांदेडात भव्य मोर्चा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाला कडाडून विरोध करण्यासाठी आज नांदेडात भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे नेतृत्व आंबेडकरी चळवळीचे नेते आनंदराज आंबेडकर यांनी केले.

महात्मा फुले यांच्या पुतळ्याला विनम्र अभिवादन करून या मोर्चाला प्रारंभ झाला. समाजामध्ये मतभेद निर्माण करून आरक्षण संपवण्यासाठी उपवर्गीकरण केले जात असून, याला तीव्र विरोध करण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीतील लोकांमध्ये फूट पाडून आरक्षण बंद करण्याचा सरकारचा डाव आहे. तर दुसरीकडे मातंग समाजाने अ, ब, क, ड उपवर्गीकरण करावे ही मागणी केली आहे. यासाठी समाजामध्ये मतभेद निर्माण करून फूट पाडण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला.

आरक्षणाचे उपवर्गीकरण होऊ नये यासाठी ५९ जातीतील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन लढा देण्याची गरज असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. ‘आरक्षण उपवर्गीकरण रद्द करा’, ‘जयभीम’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय असो’, ‘संविधानाचा विजय असो’, ‘आनंदराज आंबेडकर यांचा विजय असो’, ‘सरकारचा कुटिल डाव हाणून पाडा’ या घोषणांनी आज शहर दुमदुमून गेले. या मोर्चाला उत्स्फूर्त पाठिंबा मिळाला. निळे ध्वज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा हातात घेऊन हजारो बांधव यात सामील झाले होते.

हा मोर्चा आयटीआय, शिवाजीनगर, कलामंदिर, वजिराबाद, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. तेथे जिल्हाधिकाऱ्यांना यासंदर्भात सविस्तर निवेदन देण्यात आले. यावेळी अनेक मान्यवरांनी आरक्षण उपवर्गीकरणाचा सरकारचा डाव उधळून लावण्याचे आवाहन केले. याप्रसंगी आनंदराज आंबेडकर, मनपाचे विरोधी पक्षनेते प्रशांत इंगोले, रमेश सोनाळे, श्याम कांबळे, भदंत पय्याबोधी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. संपूर्ण जिल्ह्यातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते या मोर्चात सहभागी झाले होते. मोर्चात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला होता. अनेक ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्यांनी चहा, पाणी व नाश्त्याची व्यवस्था केली होती.