बाप्पाचा आगमन आणि विसर्जन मार्ग ‘खड्डेमुक्त’, महापालिकेचे गणेशोत्सव समन्वय समितीला आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गणेशोत्सव हा महाराष्ट्राचा महत्त्वाचा व देशातला सर्वात मोठा उत्सव असून तो निर्विघ्नपणे पार पडावा यासाठी मुंबई महानगरपालिका सज्ज असून, गणेश आगमन व विसर्जन मार्गावरील खड्डे तातडीने बुजवण्याचे निर्देश दिले जातील, असे आश्वासन महापौर रितू तावडे यांनी बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीला दिले.

आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समितीने महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन गणेश मंडळांकडून आलेल्या तक्रारी व अडचणींबाबत सविस्तर चर्चा केली. सर्व अडचणींचे निराकरण करण्यासंदर्भात संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील, असे महापौर तावडे यांनी यावेळी समितीला आश्वस्त केले.

महापौरांच्या वतीने यंदा गणेशोत्सवाच्या काळात आरोग्य उत्सव आयोजित केला जाणार आहे. त्यात जास्तीत जास्त मंडळांचा सहभाग व्हावा यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी समितीच्या वतीने देण्यात आले.

बाहेरच्या राज्यांतून येणाऱ्या माव्याची तपासणी करा

गणेशोत्सवाच्या काळात पेढे, मोदक आणि प्रसादासाठी लागणारा मावा मोठय़ा प्रमाणात बाहेरच्या राज्यांतून येतो. काही वर्षांपूर्वी गणेशोत्सवादरम्यान ठाणे येथे अशाच खराब माव्यामुळे विषबाधा झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे बाहेरच्या राज्यातून येणाऱ्या माव्याची व्यवस्थित तपासणी केली जावी अशी मागणी समन्वय समितीने केली. त्यावर संबंधित विभागांना तशा सूचना दिल्या जातील, असे महापौर रितू तावडे यांनी सांगितले.

जीवरक्षकांच्या संख्येत वाढ, रेल्वे पुलांची दुरुस्ती करणार

 गिरगाव, दादर आणि जुहू चौपाटी येथे विसर्जनाच्या दिवशी महिलांसाठी फिरत्या शौचालयांची व्यवस्था पूर्वीपेक्षा या वर्षी जास्त प्रमाणात केली जाईल.
 जीवरक्षकांच्या संख्येत आवश्यकतेनुसार वाढ केली जाईल.
 गणेशमूर्तींच्या ट्रॉली विसर्जनावेळी चौपाटीच्या वाळूमध्यचे रुतून बसू नयेत म्हणून स्टील प्लेट व्यवस्थित टाकण्याचे निर्देश कंत्राटदारांना दिले जातील.
 लालबाग व अन्य भागांत उड्डाणपुलांवरून होणारी गळती थांबवण्याचे निर्देश दिले जातील.
 नादुरुस्त असलेल्या रेल्वे पुलांच्या दुरुस्तीसाठी वाहतूक विभाग आणि महापालिकेच्या समन्वयाने दुरुस्ती कामे हाती घेतली जातील.
 गणेशोत्सवादरम्यान महापालिकेची गाडी दिवसातून दोन वेळा गणेश मंडपांजवळ निर्माल्य घेऊन जाण्यासाठी येईल असे निर्देश दिले जातील.