
ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कांगारूंना हरवायचे म्हणजे काही पोरखेळ नाही, पण बांगलादेशने डार्विनमध्ये हे करून दाखवले आणि तेही दिमाखात. मेहदी हसन मिराजच्या फिरकीसमोर ऑस्ट्रेलियाची फलंदाजी अक्षरशः ढेपाळली आणि बांगलादेशने पहिल्या कसोटीत तब्बल नऊ विकेट्सनी विजय मिळवत इतिहास रचला. हा केवळ ऑस्ट्रेलियालाच नव्हे तर अवघ्या कसोटी क्रिकेटलाही हादरा आहे.
ऑस्ट्रेलियाने दुसऱया डावात 284 धावा केल्या. त्यामुळे बांगलादेशसमोर विजयासाठी अवघ्या 57 धावांचे लक्ष्य होते. चौथ्या दिवशी मोमिनुल हकने विजयी धाव घेताच बांगलादेशच्या ऐतिहासिक विजयावर शिक्कामोर्तब झाले. हा विजय बांगलादेशी वाघांसाठी खास होता. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर बांगलादेशचा हा पहिलाच कसोटी विजय आहे. दोन्ही संघांमधील ऑस्ट्रेलियातील ही केवळ तिसरी कसोटी होती. तब्बल 23 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी खेळायला उतरलेल्या बांगलादेशने थेट अव्वल मानांकित ऑस्ट्रेलियालाच त्यांच्या घरात धूळ चारली. हा केवळ विजय नव्हता तर बांगलादेशी वाघांनी कांगारूंची शिकार केली.
पहिल्या डावात बांगलादेशने 426 धावांचा डोंगर उभा केला होता. तन्झिद हसनने 101, कर्णधार नजमुल हुसेन शांतोने 84 आणि मेहदी हसनने 65 धावा करत ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अक्षरशः परीक्षा घेतली. जोश हेझलवूडने सहा विकेट्स घेतल्या, तरी बांगलादेशने मोठी आघाडी मिळवली. यानंतर बांगलादेशच्या गोलंदाजांनी कांगारूंची पुन्हा कोंडी केली. ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 198 धावांत संपला. हसन महमूदने तब्बल सहा विकेट्स घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजीची पंबर मोडली.
दुसऱ्या डावात मात्र कॅमेरून ग्रीनने एकटय़ाने किल्ला लढवला. तब्बल पाच तास झुंज देत त्याने 201 चेंडूंमध्ये 104 धावांचे शतक ठोकले. त्याच्या खेळीत चार चौकार होते, पण दुसऱ्या टोकाला अपेक्षित साथ न मिळाल्याने ग्रीनचे शतक ऑस्ट्रेलियाला संकटातून बाहेर काढू शकले नाही.
मिराजने मग आपला फिरकीचा फास आवळला. अॅलेक्स कॅरी, ब्यू वेबस्टर, पॅट कमिन्स आणि नॅथन लायन यांना त्याने तंबूचा रस्ता दाखवला. मिराजने 66 धावांत पाच विकेट्स घेतल्या. परदेशातील कसोटीत पाच विकेट्स घेण्याची त्याची ही तिसरी, तर कारकिर्दीतील 15वी वेळ ठरली. सामन्यात अर्धशतकासह त्याने पाच विकेट्स घेत अष्टपैलू ठसा उमटवला. हसन महमूदनेही सामन्यात तब्बल नऊ विकेट टिपल्या. ऑस्ट्रेलियाला दोन्ही डावांत 300 धावांच्या आत रोखत बांगलादेशने आपल्या गोलंदाजीची ताकद दाखवून दिली
विशेष म्हणजे, सामन्याच्या आठवडाभर आधी बांगलादेशला सीए इलेव्हनने अवघ्या 54 धावांत गुंडाळले होते. त्यात वेगवान गोलंदाज नाहिद राणाही मालिकेत नव्हता. त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धचा हा विजय आणखी धक्कादायक ठरला. तन्झिदचे पहिले कसोटी शतक, शांतोची संयमी फलंदाजी, महमूदची भेदक गोलंदाजी आणि मिराजची फिरकी यांच्या जोरावर बांगलादेशने ऑस्ट्रेलियाच्या घरातच ऐतिहासिक विजयाचा झेंडा रोवला
टी-20 विश्वचषकाला मुकलेल्या बांगलादेशने मार्चपासून सुरू केलेल्या दमदार पुनरागमनावर डार्विनच्या विजयाने आणखी एक मोठी मोहोर उमटवली. कांगारूंच्या अंगणात बंगाली वादळ घोंगावले आणि ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावरच शरणागती पत्करावी लागली.
संक्षिप्त धावफलक
बांगलादेश – 426 व 57/1 (मोमिनुल 30 नाबाद, शादमान ना. 25) विजयी वि. ऑस्ट्रेलिया – 198 व 284 (ग्रीन 104, स्मिथ 44; मेहदी हसन 5/66, हसन महमूद 3/56).




























































