
भाजपचे अध्यक्ष नितीन नवीन यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जवळपास सात महिन्यांनी 65 सदस्यांची नवी कार्यकरीणी आज जाहीर केली. ज्येष्ठ नेत्या व राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे या उपाध्यक्षपदी कायम राहणार आहेत. तर, राम माधव यांना उपाध्यक्ष आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करुन कार्यकारिणीत परत आणण्यात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, भाजपचे आयटी सेलचे प्रभारी अमित मालवीय यांना हटविण्यात आले असून त्यांच्या जागेवर दीपक म्हस्के यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
नितीन नवीन यांच्या कार्यकारिणत 13 राष्ट्रीय उपाध्यक्ष, 8 सरचिटणीस, 16 सचिव आणि 28 सदस्यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातून भारती पवार यांचा उपाध्यक्षपदी तर विनोद तावडे यांचा समावेश आहे. याशिवाय महाराष्ट्रातून प्रीती गांधी यांच्यावर सोशल मीडिया सहसमन्वक म्हूणन जबाबदारी सोपविण्यात आली आहे. याशिवाय मुंबईचे शिवप्रकाश यांच्याकडे राष्ट्रीय संयुक्त महामंत्रीपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.राजीनामा दिलेले धर्मेंद्र प्रधान यांनाही केंद्रीय कार्यकारिणीत स्थान नाही.
पीयूष गोयल यांची वापसी
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची कोषाध्यक्षपदी वापसी झाली आहे. ते 2014मध्ये कोषाध्यक्ष होते. मात्र, मोदी सरकारमध्ये मंत्रिपद मिळाल्यानंतर त्यांच्याऐवजी दीपक अग्रवाल यांना कोषाध्यक्षपद दिले होते. ‘एक व्यक्ती, एक पद’ या भाजपच्या तत्त्वानुसार पीयूष गोयल यांच्या मंत्रीपदी कायम राहण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
पंकजा मुंडे, अनुराग ठाकूर यांना कार्यकारिणीत स्थान नाही
नितीन नवीन यांच्या कार्यकारिणीतून पंकजा मुंडे आणि अनुराग ठाकूर यांना वगळण्यात आले आहे. पंकजा मुंडे यांना राज्यात मंत्रीपद मिळाले आहे. तर, अनुराग ठाकूर यांना स्थान न दिल्यामुळे त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळात जाण्याची चर्चा आहे.




























































