
महापालिकेचे कर्मचारी धीरज परदेशी या तरुणाची मुकुंदनगर परिसरात झालेल्या हत्येनंतर अहिल्यानगर शहरात तणावाच्या पार्श्वभूमीवर आता या प्रकरणाने राजकीय वळण घेतले आहे. याबाबत सत्ताधारी महायुतीतीलच दोन प्रमुख नेत्यांच्या भूमिकांमध्ये फरक दिसून आल्याने चर्चेला उधाण आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप यांनी पोलिसांच्या तपासावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले असताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी मात्र पोलिसांच्या तपासाचे समर्थन केले आहे.
धीरज परदेशी यांच्या हत्येनंतर शहरात सलग दोन दिवस तणावाचे वातावरण होते. घटनेच्या निषेधार्थ बंद, रस्ता-रोको यांसारखी आंदोलने झाली. या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत आठ आरोपींना अटक केल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक एम. सुदर्शन यांनी दिली आहे. मात्र, तपासाची दिशा आणि पोलिसांची कार्यपद्धती यावर आमदार संग्राम जगताप यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याचा दावा करत त्यांनी काही पोलीस अधिकाऱ्यांवर गंभीर आरोप केले. स्थानिक पोलिसांवरील विश्वास कमी झाल्याचे सांगत या प्रकरणासाठी स्वतंत्र तपास अधिकारी नेमावा, अशी मागणीही त्यांनी केली.
जगताप यांच्या या भूमिकेमुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद उघड झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, आमदारांनी थेट पोलिसांच्या भूमिकेवरच संशय व्यक्त केल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मात्र पोलिसांची बाजू घेत, ‘पोलिसांच्या तपासावर शंका घेण्याचे कारण नाही,’ असे सांगत पोलिसांकडून योग्य पद्धतीने तपास सुरू असल्याचे स्पष्ट केले. आतापर्यंत बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. लोकप्रतिनिधींनी पोलिसांचे मनोबल खचची करण्याऐवजी कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी यंत्रणेच्या पाठीशी उभे राहण्याची आवश्यकता असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
गरज पडल्यास ‘एसआयटी’चा पर्याय
या प्रकरणातील आंदोलनादरम्यान काही व्यक्तींनी आरोपी पाकिस्तानशी संबंधित असल्याचा आरोप केल्याच्या मुद्द्यावरही पालकमंत्र्यांनी भाष्य केले. कोणत्याही देशविघातक शक्तींचा संबंध असल्याचे आढळल्यास त्याची चौकशी केली जाईल. प्रकरणाची व्याप्ती किंवा तपासाची गरज लक्षात घेऊन आवश्यकता भासल्यास पोलीस अधीक्षकांशी चर्चा करून राज्य सरकारकडे विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्याची शिफारस केली जाऊ शकते, असे विखे यांनी संकेत दिले.





























































