इंडिगोच्या तिकीट बुकिंग यंत्रणेत बिघाड, चेक-इन करताना देखील प्रवाशांना अडचणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

देशातील महत्त्वाची विमान कंपनी इंडिगोच्या तिकीट बुकिंग यंत्रणेत शुक्रवारी काही काळ तांत्रिक बिघाड झाला होता. त्यामुळे प्रवाशांना काही काळ अडचणींचा सामना करावा लागला. प्रवाशांना ऑनलाइन सेवा वापरता येत नव्हत्या. कंपनीने आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाउंटवर यासंदर्भातील माहिती प्रसिद्ध केली आहे. दरम्यान, याआधी देखील बुधवारी विमान कंपनीच्या बुकिंग यंत्रणेत तांत्रिक बिघाड झाला होता.

 

इंडिगो कंपनीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही यासंदर्भात माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. ‘आमच्या मुख्य आरक्षण प्रणालीमध्ये सध्या अधूनमधून तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे काही ग्राहकांना आमच्या ऑनलाइन सेवांचा वापर करण्यात अडचण येऊ शकते’, असे इंडिगोने शुक्रवारी आपल्या संदेशात म्हटले.

इंडिगोच्या तिकीट बुकिंग यंत्रणेत बिघाड, चेक-इन करताना देखील प्रवाशांना अडचणी

ही अडचण शक्य तितक्या लवकर दूर करण्यासाठी अन्य सहकारी कंपन्यांसोबत आमच्या टीम प्राधान्याने काम करत आहेत, असे इंडिगोने सांगितले. तसेच, झालेल्या गैरसोयीबद्दल कंपनीने दिलगिरी व्यक्त केली.

एका अधिकाऱ्याने सांगितले की, या तांत्रिक अडचणी आता दूर करण्यात आल्या असून बुकिंग यंत्रणा सध्या नेहमीप्रमाणे कार्यरत आहे. इंडिगो विमान कंपनी नॅव्हिटेअर आरक्षण प्रणालीचा वापर करते.

इंडिगो दररोज सुमारे २,२०० विमानांची सेवा देते. या विमानांद्वारे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय विविध ठिकाणांना जोडले आहे.

जुलैमध्ये इंडिगोने देशांतर्गत मार्गांवर ८०.८२ लाख प्रवाशांची वाहतूक केली. या काळात विमान कंपनीचा बाजारातील वाटा ६७.४ टक्के होता.

दरम्यान, बुधवारी इंडिगोने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये आपल्या मुख्य आरक्षण प्रणालीमध्ये अधूनमधून तांत्रिक अडचणी येत असल्याचे सांगितले होते.

डिसेंबर २०२५ मध्ये विमान कंपनीच्या सेवेत मोठ्या प्रमाणात व्यत्यय निर्माण झाला होता. त्यानंतर कंपनीला विविध नियामक कारवाईलाही सामोरे जावे लागले होते.