
पालक आपल्या मुला-मुलींना निर्धास्तपणे स्कूलबसमध्ये सोडतात. पण अशा बसचा चालकच दारुडा निघाला तर?… कल्याणमध्ये असा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मद्यधुंद चालकाच्या हाती स्कूलबसचे स्टेअरिंग असल्याचे भीषण वास्तव समोर आले असून बापू गरुड असे त्याचे नाव आहे. वाहतूक पोलिसांनी त्याला बससह ताब्यात घेतले आहे. दारू पिऊन गाडी चालवताना एखादा भीषण अपघात झाला असता तर त्यास जबाबदार कोण, असा सवाल पालकांनी केला आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षा वाऱ्यावर सोडणाऱ्या चालकावर कठोर कारवाई करावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
कल्याण पश्चिमेतील बाईचा पुतळा परिसरात वाहतूक पोलिसांकडून स्कूलबसची नाकाबंदी करून विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात येत होती. यावेळी एका स्कूल व्हॅनची तपासणी करताना चालक बापू गरुड हा मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ही बाब समजताच वाहतूक पोलीस निरीक्षक उमेश सावंत यांच्या पथकाने तत्काळ कारवाई करीत चालकाला ताब्यात घेतले.
तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार
पोलिसांनी स्कूल व्हॅन ताब्यात घेतली आणि त्यातील विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले. त्यामुळे संभाव्य दुर्घटना टळली. मात्र मद्यधुंद अवस्थेत वाहन चालविण्याचा प्रकार समोर आल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे. दरम्यान वाहतूक विभागाने संबंधित स्कूल व्हॅन जप्त करून चालकाविरोधात दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या वाहनांमध्ये अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन होऊ नये, यासाठी तपासणी मोहीम अधिक तीव्र करणार असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.






























































