
मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्हा रुग्णालयातील विशेष नवजात शिशू उपचार कक्षात (SNCU) शनिवारी पहाटे कार्डल वॉर्मरला आग लागल्याची घटना घडली. या दुर्घटनेत तीन नवजात बाळ गंभीररित्या भाजले असून एका बाळाचा मृत्यू झाला आहे. मात्र, शवविच्छेदन अहवालानुसार या बाळाचा मृत्यू भाजल्यामुळे नव्हे, तर जन्मजात आजारामुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. इतर दोन बाळांची प्रकृती स्थिर आहे.
ही आग शनिवारी पहाटे सुमारे 1.50 वाजता लागली. कार्डल वॉर्मरमधील हीटिंग कॉइलमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याने ठिणग्या उडाल्या आणि त्यानंतर वॉर्मरने पेट घेतल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे. नवजात बाळांच्या शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यासाठी, विशेषतः अकाली जन्मलेल्या आणि कमी वजनाच्या बाळांसाठी कार्डल वॉर्मरचा वापर केला जातो.
आग लागली त्यावेळी रुग्णालयाच्या SNCU च्या इन-बॉर्न युनिटमध्ये 33 नवजात शिशू दाखल होते. याशिवाय आऊट-बॉर्न युनिटमध्ये सुमारे 30 बाळांवर उपचार सुरू होते. ड्युटीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लक्षात आग येताच त्यांनी अवघ्या 30 ते 45 सेकंदांत पेटलेला पाळणा वॉर्मर इतर बाळांपासून दूर नेला. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. या वॉर्मरवर त्यावेळी तीन बालकं होती.
आग लागल्यानंतर इन-बॉर्न आणि आऊट-बॉर्न युनिटमधील सर्व बाळांना सुरक्षितपणे स्टेप-डाउन युनिटमध्ये हलवण्यात आले. जखमी झालेल्या तीन बाळांवर उपचार करण्यात आले. तेव्हा त्यांची प्रकृती स्थिर होती. त्यानंतर या बालकांना अत्याधुनिक रुग्णवाहिकेतून जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले.
यापैकी एका बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मात्र, शवविच्छेदनात त्याचा मृत्यू भाजल्याच्या दुखापतीमुळे झालेला नसून जन्मजात आरोग्यविषयक गुंतागुंतीमुळे झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे बाळ घटनेच्या काही तासांपूर्वीच जन्मले होते. त्याला जन्मजात डायफ्रॅग्मॅटिक हर्निया (CDH) हा गंभीर आजार होता. या आजारात डायफ्रॅग्ममध्ये छिद्र असल्याने पोटातील अवयव छातीच्या पोकळीत सरकतात. त्यामुळे हृदय आणि फुफ्फुसांवर दबाव येऊन फुफ्फुसांची पूर्ण वाढ होत नाही आणि जन्मानंतर बाळाला श्वास घेण्यास गंभीर अडचणी निर्माण होतात.
डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, या बाळाच्या जगण्याची शक्यता आधीपासूनच कमी होती. जन्मानंतर तातडीने शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याची माहिती कुटुंबीयांना देण्यात आली होती. मात्र, छिंदवाडा जिल्हा रुग्णालयात बाल शल्यचिकित्सक उपलब्ध नसल्याने अशी शस्त्रक्रिया करणे शक्य नव्हते. संबंधित कुटुंबीयांचे आरोग्य विभागाशी संबंध असल्याचे सांगण्यात येत असून, त्यांनी बाळाला अन्य रुग्णालयात नेण्यास असमर्थता व्यक्त केल्याचे सूत्रांनी सांगितले.
आगीत जखमी झालेली अन्य दोन बालकं चार दिवसांची आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यापैकी एक बाळ कमी वजनाचे असून त्याला रक्तातील संसर्ग (सेप्सिस) आणि श्वसनाचा त्रास आहे. दुसऱ्या बाळाला अन्य काही आरोग्यविषयक गुंतागुंत असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे मोठी दुर्घटना टळली. इन-बॉर्न युनिटमधील नवजात बाळांना सुरक्षितपणे बाहेर हलवण्याबरोबरच आऊट-बॉर्न युनिटमधील सुमारे 30 बालकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले. त्यामुळे आग संपूर्ण SNCU मध्ये पसरण्याचा आणि त्यानंतर थेट वरच्या मजल्यावर असलेल्या स्त्रीरोग विभागापर्यंत पोहोचण्याचा धोका टळला.
























































