
महापालिका शाळेतील सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी भाईंदर उत्तन येथील केशवसृष्टीमध्ये सहल नेण्यात येणार आहे. या सहलीचा प्रस्ताव टेंडर न काढता गुरुवारी स्थायी समितीत मंजुरीसाठी आला. या प्रस्तावाला काँग्रेस, मनसेने जोरदार विरोध केला. एका विशिष्ट विचारधारेला प्रमोट करण्यासाठी आणि स्वयंसेवक तयार करण्यासाठी ही सहल असल्याचा आरोप केला. मात्र या विरोधकाकडे दुर्लक्ष करीत बहुमताच्या जोरावर भाजपाने प्रस्ताव मंजूर केला. त्यामुळे वादग्रस्त ठरलेल्या सहलीचा मार्ग मोकळा झाला आहे.
विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी केशवसृष्टी येथे पर्यावरण अध्ययन व प्रशिक्षण सहलीचे पालिकेने आयोजन केले आहे. या प्रस्तावाला काँग्रेसचे गटनेते अशरफ आझमी यांनी विरोध केला. बीएनएचएस, संजय गांधी नॅचरल पार्क, महाराष्ट्र नेचर पार्क अशा संस्थांना डावलून केशवसृष्टीची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या स्मृतीस आदरांजली म्हणून केशवसृष्टी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे एका विचारधारेसाठी ही सहल आयोजित करू नये, अशी सूचना आझमी यांनी मांडली. विशेष म्हणजे सहलीसाठी 2 कोटी 46 लाख 32 हजार रुपये खर्च करण्यात येणार आहेत. एवढा मोठा खर्च असूनही निविदा काढण्यात आलेली नाही, याला आझमी यांनी आक्षेप घेत प्रस्ताव दप्तरी दाखल करण्याची उपसूचना मांडली. मनसेचे गटनेते यशवंत किल्लेदार यांनी सहल मुंबईच्या बाहेर भाईंदर येथे का आयोजित केली आहे? अशा सहलींतून स्वयंसेवक निर्माण करायचे आहेत का, असा प्रश्न करत जोरदार विरोध केला.
भाजपाचे गटनेते गणेश खणकर आणि सभागृह नेते प्रभाकर शिंदे यांनी या सहलीमध्ये विद्यार्थ्यांना पर्यावरण भ्रमण, कचरा व्यवस्थापन, गोशाळा, बायोगॅस, गांडूळ खतनिर्मिती, पेपर व प्लास्टिक रिसायकल, जल व्यवस्थापन या विषयाचा अंतर्भाव असलेली माहिती देण्यात येणार असल्याचा दावा केला. यावर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांनी पर्यावरणपूरक शेती कशी अंगिकारली हे शिकवण्यासाठी ही सहल असल्याचे स्पष्ट केले. अखेर स्थायी समिती अध्यक्ष प्रभाकर शिंदे यांनी प्रस्ताव मतास टाकला असता, विरोधकांचा विरोध डावलून बहुमताने प्रस्ताव मंजूर करण्यात आला.




























































