
भाजी किंवा फळे कापण्यासाठी वापरला जाणारा चॉपिंग बोर्ड प्रत्येक स्वयंपाकघरात महत्त्वाचा मानला जातो. अनेकदा एकाच बोर्डवर विविध गोष्टी कापल्या जातात. परंतु, दीर्घकाळ तोच बोर्ड वापरणे आणि त्याची नीट स्वच्छता न करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. चॉपिंग बोर्डवर चाकूचे बारीक डाग किंवा कट पडतात. ज्यामध्ये बारीक खाचांमध्ये अन्नाचे कण आणि बॅक्टेरिया सहज साचतात. फक्त पाण्याने धुतल्याने ही घाण पूर्णपणे निघून जात नाही. सुदैवाने, महागड्या केमिकल्सऐवजी तुमच्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणाऱ्या दोन साध्या गोष्टींचा वापर करून तुम्ही हा चॉपिंग बोर्ड अवघ्या मिनिटांत अगदी चकाचक आणि जंतूमुक्त करू शकता.
प्रत्येक वापरानंतर बोर्ड कसा स्वच्छ करावा :
- सर्वात आधी बोर्डवर राहिलेली भाजी किंवा अन्नाचे कण पूर्णपणे काढून टाका.
- चॉपिंग बोर्ड गरम पाणी आणि डिशवॉशिंग लिक्विडच्या मदतीने स्क्रबरने नीट घासून स्वच्छ करा.
- बोर्ड धुतल्यानंतर बोर्ड लगेचच कपड्याने पुसून बंद कपाटात ठेवण्याऐवजी हवेशीर ठिकाणी पूर्णपणे सुकण्यासाठी ठेवा. ओल्या बोर्डवर जिवाणू वेगाने वाढतात.
- चॉपिंग बोर्डवरून दुर्गंधी येत असल्यास, त्यावर थोडा बेकिंग सोडा पसरवून हलक्या हाताने घासा आणि नंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्या. लिंबाचा रस लावल्यानेही बोर्डवरील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते.
(टीप: हे उपाय नियमित स्वच्छतेचा पर्याय नाहीत, प्रत्येक वापरानंतर साबण आणि पाण्याने धुणेच सर्वात गरजेचे आहे.)
- व्हेज आणि नॉन-व्हेजसाठी वेगळे बोर्ड ठेवा शक्य असल्यास घरात दोन चॉपिंग बोर्ड ठेवावेत. एक फळे-भाज्यांसाठी आणि दुसरा मांसाहारी पदार्थांसाठी वापरावा. यामुळे एका अन्नातील जिवाणू दुसऱ्या अन्नात जाण्याचा धोका टळतो.
चॉपिंग बोर्ड कधी बदलावा?
- चॉपिंग बोर्डवर खूप खोल कट पडले असतील.
- लाकडी बोर्डला भेगा पडल्या असतील किंवा प्लास्टिकच्या बोर्डचा पृष्ठभाग खराब झाला असेल.
- स्वच्छ केल्यानंतरही दुर्गंधी जात नसेल तर जुना बोर्ड बदलून नवा बोर्ड घ्या.


























































