
दिल्लीत 18 वी ब्रिक्स शिखर परिषद उद्या, शनिवारपासून सुरू होणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या शिखर परिषदेसाठी राजधानी दिल्लीत जोरदार तयारी करण्यात आली आहे. ब्रिक्समध्ये 11 प्रमुख विकसनशील देश सहभागी होणार आहेत. यामध्ये ब्राझील, चीन, मिस्र, इथियोपिया, इंडोनेशिया, हिंदुस्थान, इराण, रशिया, सौदी अरब, दक्षिण आफ्रिका आणि संयुक्त अरब अमिरात यांचा समावेश आहे.
‘ब्रिक्स’ परिषदेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा ठेवण्यात आली आहे. सुमारे 15 हजारहून अधिक दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या 200 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत. ‘ब्रिक्स’ परिषदेसाठी दिल्ली बंद राहणार नसली तरी मात्र ‘व्हीव्हीआयपीं’च्या ताफ्यांच्या हालचालींच्या वेळी काही मार्गांवर वाहतूक तात्पुरती थांबवण्यात येईल. परदेशी प्रतिनिधींच्या विमानतळापासून हॉटेलपर्यंत आणि तेथून परिषद स्थळ तसेच इतर नियोजित ठिकाणांपर्यंतच्या प्रवासासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. भारत मंडपम येथे बहुस्तरीय सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली असून प्रवेश नियंत्रण आणि देखरेख व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. परदेशी प्रतिनिधींची ये-जा सुरळीत व्हावी यासाठी दिल्ली पोलिसांनी शेजारील राज्यांतील सुरक्षा यंत्रणांशीही समन्वय साधला असून गुप्तचर माहितीची देवाण-घेवाण केली जात आहे.
या परिषदेनिमित्त 4 हजार 800 वाहतूक पोलीस तैनात केले आहेत. शहरातील बससेवाही सुरू राहील. मात्र काही मार्ग प्रतिबंधित असतील. रिक्षा, टॅक्सी आणि ऍप-आधारित कॅब सेवा सुरू राहतील.
परिषदेच्या दोन दिवसांच्या काळात दिल्ली मेट्रोची सेवा सुरू राहणार असली तरी सुरक्षेच्या कारणास्तव काही स्थानकांचे प्रवेश किंवा बाहेर पडण्याचे मार्ग तात्पुरते बंद केले जाऊ शकतात.
या शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग, दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती सिरील रामाफोसा, मिस्रचे राष्ट्रपती अब्दुल फताह अस्सीसी, इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्राबोवो सुबियांतो, इराणचे राष्ट्रपती मसूद पेजेश्कियन सहभागी होतील. अबूधाबूचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन जायद अल नहयान आणि इथोपियाचे पंतप्रधान आबी अहमद अली, ब्राझीलचे विदेश मंत्री माउरू वीएइरा, सौदी अरबचे विदेश मंत्री प्रिन्स फैसल बिन फरहान अल सऊद यांची प्रमुख उपस्थिती असेल.





























































