उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री हरीश रावत यांचा काँग्रेसमधील पदांचा राजीनामा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते हरीश रावत यांनी शुक्रवारी पक्षाच्या दोन महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला. उत्तराखंड दुय्यम सेवा निवड आयोगाच्या (UKSSSC) २०१६ मधील भरती गैरव्यवहार प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) रावत यांचे स्वीय सहाय्यक (PA) चंदन सिंह जीना यांच्या घरावर छापा टाकून मोठी रोकड आणि सोने जप्त केले होते. या कारवाईनंतर रावत यांनी हा निर्णय घेतला.

रावत यांनी उत्तराखंड प्रदेश काँग्रेस कमिटीच्या (PCC) कार्यकारिणीचे सदस्यत्व आणि काँग्रेस कार्यसमितीच्या (CWC) स्थायी निमंत्रित सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या निकटवर्तीयाशी संबंधित या प्रकरणामुळे काँग्रेसच्या भ्रष्टाचाराविरोधातील लढ्याला कोणताही धक्का लागू नये किंवा पक्षाची प्रतिमा मलीन होऊ नये, यासाठी पदांवरून पायउतार होत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

स्वीय सहाय्यकाच्या घरातून ३२ लाखांची रोकड आणि सोने जप्त

‘ईडी’ने गुरुवारी डेहराडूनमध्ये अनेक ठिकाणी छापे टाकले. यामध्ये UKSSSC चे माजी अधिकारी, ओएमआर (OMR) शीट तपासणाऱ्या खासगी कॉम्प्युटर एजन्सीचे मालक आणि संशयित मध्यस्थांच्या ठिकाणांचा समावेश होता. या कारवाईदरम्यान हरीश रावत यांचे स्वीय सहाय्यक चंदन सिंह जीना यांच्या घरातून ३२ लाख रुपयांची रोख रक्कम, सोने आणि महागडी घड्याळे जप्त करण्यात आली.

काय आहे प्रकरण?

उत्तराखंड दुय्यम सेवा निवड आयोगाने २०१६ मध्ये घेतलेल्या ‘ग्रामपंचायत विकास अधिकारी’ भरती परीक्षेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. या प्रकरणी उत्तराखंड पोलीस आणि दक्षता विभागाने (Vigilance Bureau) नोंदवलेल्या चार गुन्ह्यांच्या (FIR) आधारे ‘ईडी’ने मनी लाँड्रिंगचा गुन्हा दाखल करून ही कारवाई सुरू केली आहे.