
माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी अनमोल बिष्णोई याचा ताबा मिळवण्यासाठी मुंबई पोलिसांनी आतापर्यंत कोणती पावले उचलली, असा सवाल करत याबाबत सविस्तर तपशील सादर करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने आज पोलिसांना दिले. दरम्यान अनमोल बिष्णोई याला हिंदुस्थानात आणल्यानंतर त्याचा ताबा मिळवण्याच्या प्रक्रियेत दिरंगाई होत असल्याचा आरोप सिद्दीकी कुटुंबीयांनी केला आहे.
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांनी अनमोल बिष्णोईचा ताबा मिळवण्यासाठी सरकारी पक्षाला आदेश देण्याची मागणी करणारा अर्ज दाखल केला आहे. त्यावर विशेष सत्र न्यायालयात आज बुधवारी या खटल्यावर सुनावणी झाली. यावेळी विशेष सरकारी वकील महेश मुळे यांनी तपास अधिकारी अनुपस्थित असल्याचे सांगितले. तसेच प्रकृती ठीक नसल्याने आपल्यालाही न्यायालयात सविस्तर माहिती देता येणार नसल्याचे नमूद करून अतिरिक्त वेळ मागितला. याची गंभीर दखल घेत न्यायालयाने आतापर्यंत केलेल्या तपासाची माहिती सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले.
सुनावणीच्या स्थगितीला विरोध
बाबा सिद्दीकी यांच्या कुटुंबीयांतर्फे विशेष वकील प्रदीप घरत आणि त्रिवणकुमार कर्नानी यांनी सुनावणी पुढे ढकलण्याच्या सरकारच्या मागणीला विरोध केला. सरकारी पक्ष जाणीवपूर्वक कार्यवाही लांबवत असून न्यायालयाच्या यापूर्वीच्या आदेशांचे पालन करण्यात अपयशी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने सरकारी पक्षाला 28 ऑक्टोबरपर्यंत मुदत दिली व संबंधित तपशील पुढील सुनावणीवेळी सादर करण्यास बजावले.



























































