
>> व्ही. के. कौर
संरक्षणाच्या व्यापक परिप्रेक्षात विचार करता, हिंदी महासागराच्या विशाल पटावर किनारपट्टीवरील प्रत्येक उथळ खाडी आणि सागरी प्रवेशद्वारावर अभेद्य पहारा ठेवणाऱ्या अशा चपळ जहाजांची उपस्थिती ठेवणे भारताला अपरिहार्य बनले आहे. कारण या सागरावरील वर्चस्व फक्त मोठ्या विमानवाहू नौकांवर अवलंबून ठेवता येत नाही. या पार्श्वभूमीवर ’आयएनएस मंगरोल’ या युद्धनौकेच्या आगमनाने भारताने आपल्या सागरी संरक्षणातील एक महत्त्वाची पोकळी भरून काढली आहे.
युद्धशास्त्राच्या मूलभूत सिद्धांतानुसार, भूमीवरील सीमांचे रक्षण करणे जितके आव्हानात्मक असते, त्याहून अधिक गुंतागुंतीचे आणि सूक्ष्म नियंत्रण समुद्राखालील हालचालींवर ठेवावे लागते. महान नौदल रणनीतीकार अल्फ्रेड थेअर महान यांनी एके ठिकाणी नोंदवले होते की, समुद्रावरील नियंत्रण हे केवळ आकाराने अवाढव्य असणाऱ्या जहाजांच्या संख्येवर अवलंबून नसते, तर मोक्याच्या सागरी प्रदेशावर अखंड देखरेख ठेवण्याच्या अचूक क्षमतेवर ठरते. सध्याच्या बहुध्रुवीय जागतिक रचनेत आणि विशेषत आशिया-प्रशांत क्षेत्रात निर्माण होत असलेल्या सत्तास्पर्धेत हिंदी महासागर हा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला आहे. मोक्याच्या जलक्षेत्रात परकीय शक्तींच्या आण्विक तसेच पारंपरिक पाणबुडय़ांचा वाढता वावर भारताच्या सागरी सुरक्षेसमोर गंभीर आव्हाने निर्माण करत आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलाच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेले ‘आयएनएस मंगरोल’ हे लढाऊ जहाज देशाच्या सागरी संरक्षण व्यूहरचनेतील एक अत्यंत महत्त्वाचे आणि निर्णायक पाऊल ठरणार आहे.
पारंपरिक लष्करी सिद्धांतामध्ये ज्याला ‘समुद्रात शिरकाव रोखणे’ (सी डिनायल) म्हटले जाते, त्याचा थेट संबंध शत्रूच्या लपून हल्ले करणाऱ्या साधनांचा बंदोबस्त करण्याशी असतो. पाणबुडी हे आधुनिक युद्धातील सर्वात घातक आणि अदृश्य शस्त्र मानले जाते. समुद्राच्या अथांग आणि गूढ पाण्यात संपूर्ण शांततेत वावरणाऱ्या शत्रूच्या पाणबुडीचा शोध घेणे हे कोणत्याही नौदलासाठी अतिशय क्लिष्ट काम असते. विशेषत किनारपट्टीचा भाग, बंदरांचे प्रवेशमार्ग आणि उथळ पाण्याचे क्षेत्र या ठिकाणी मोठय़ा युद्धनौकांना मुक्तपणे हालचाली करणे नैसर्गिकरीत्या कठीण जाते. तिथे पाण्याचा कमी तळ, विविध प्रकारच्या लाटांचे घर्षण आणि जैविक ध्वनी यामुळे मोठय़ा आकाराचे ध्वनिशोधक (सोनार) अनेकदा भ्रमित होतात. या त्रुटीचा फायदा घेऊन शत्रूच्या छोटय़ा अथवा डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुडय़ा उथळ पाण्यात दबा धरून बसू शकतात. आयएनएस मंगरोलची निर्मिती नेमकी याच सामरिक त्रुटीवर मात करण्यासाठी करण्यात आली आहे.
कोचीन शिपयार्ड लिमिटेडने तयार केलेल्या या अत्याधुनिक युद्धनौकेचे मूळ वैशिष्ट्य म्हणजे उथळ पाण्याच्या क्षेत्रात पाणबुडीविरोधी मोहिमा यशस्वीपणे राबवण्याची तिची विलक्षण ताकद. पारंपरिक पंख्यांऐवजी यामध्ये तीन डिझेल इंजिने आणि जलप्रवाह प्रणोदन यंत्रणा (वॉटरजेट प्रोपल्शन) बसवण्यात आली आहे. ही यंत्रणा पाण्याखाली पंख्यांच्या फिरण्याने निर्माण होणारा विशिष्ट आवाज लक्षणीयरीत्या कमी करते. युद्धभूमीवर केवळ वेग पुरेसा नसतो, तर शत्रूच्या अस्तित्वाची पूर्वकल्पना मिळणे हा संरक्षणाचा पाया असतो. समुद्राखाली अंधकार आणि मर्यादित दृश्यमानता असताना केवळ ध्वनितरंगांचा आधार घ्यावा लागतो. आयएनएस मंगरोलवर बसवण्यात आलेली ‘अभय’ ही संपूर्ण स्वदेशी बनावटीची हल-माऊंटेड सोनार यंत्रणा याच सिद्धांतावर काम करते. ही यंत्रणा विशिष्ट कंप्रतेच्या ध्वनितरंगांचे उत्सर्जन करून पाण्याच्या तळाशी लपलेल्या संशयित हालचालींचा, धातूच्या आवरणांचा आणि वाहनांचा अचूक वेध घेते.
शत्रूच्या पाणबुडीची चाहूल लागल्यानंतर पुढची पायरी प्रत्यक्ष कारवाईची असते. या जहाजावर वजनाने हलके असणारे अत्याधुनिक टॉर्पेडो आणि पाणबुडीविरोधी अग्निबाण प्रक्षेपक (अँटी-सबमरीन रॉकेट लाँचर्स) तैनात करण्यात आले आहेत. दूरवर असणाऱ्या लक्ष्यावर अग्निबाणांच्या सहाय्याने पाण्याचा प्रचंड दाब निर्माण करून प्रहार करता येतो, तर जवळ आलेल्या लक्ष्याचा टॉर्पेडोद्वारे अचूक वेध घेतला जातो. त्याच वेळी, युद्धात स्वतचा बचाव करणेही तितकेच महत्त्वाचे असते. शत्रूने डागलेल्या टॉर्पेडोपासून स्वतचे संरक्षण करण्यासाठी या जहाजावर ‘मारीच’ ही प्रगत टॉर्पेडो दिशाभूल प्रणाली सज्ज आहे.
आधुनिक युद्ध हे कधीही एकांगी लढले जात नाही; लष्करी परिभाषेत त्याला ‘नेटवर्क-केंद्रित युद्ध’ (नेटवर्क-सेंट्रिक वॉरफेअर) म्हटले जाते. आयएनएस मंगरोल ही केवळ स्वतच्या शस्त्रास्त्रांवर अवलंबून असणारी स्वतंत्र यंत्रणा नाही, तर ती एका महाकाय संरक्षण साखळीचा दुवा आहे. हे जहाज सागरी गस्ती विमाने, नौदलाची टेहळणी हेलिकॉप्टर्स आणि समुद्रात खोलवर तैनात असलेल्या महाकाय विनाशिका यांच्याशी एकात्मिक डेटा लिंकद्वारे जोडले गेले आहे. आकाशातून गस्त घालणाऱ्या विमानाने टिपलेली माहिती क्षणात या जहाजापर्यंत पोहोचते आणि हे जहाज उथळ पाण्यातील संभाव्य धोक्याचा वेध घेऊन संयुक्त कारवाईला गती देते.
या जहाजाचे आणखी एक उल्लेखनीय पैलू म्हणजे याचे 80 टक्क्यांहून अधिक भाग संपूर्णत स्वदेशी आहेत. परकीय शस्त्रास्त्रांवरील अवलंबित्व कमी करून स्वतच्या तंत्रज्ञानावर विश्वास ठेवणे हे कोणत्याही सार्वभौम राष्ट्राच्या सुरक्षेसाठी मूलभूत मानले जाते. गुजरातच्या ऐतिहासिक मंगरोल या सागरी शहरावरून नाव धारण करणारे हे जहाज भूतकाळातील परामाचा वारसा पुढे चालवत आहे. पूर्वीचे आयएनएस मंगरोल हे सुरुंगविरोधी युद्धनौका म्हणून सेवेत होते आणि त्याने दोन दशकांपूर्वी निवृत्ती स्वीकारली होती. आता नव्या रूपातील हे आधुनिक जहाज त्याहून अधिक व्यापक आणि घातक जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे.
सध्याच्या भू-राजकीय वातावरणात हिंदी महासागरामध्ये सत्तासंतुलन टिकवून ठेवणे ही भारताची अनिवार्य गरज आहे. या पार्श्वभूमीवर, भारतीय नौदलात एकापाठोपाठ दाखल होत असलेल्या स्वदेशी युद्धनौका देशाच्या लष्करी सज्जतेची साक्ष देतात. ताफ्यातील जहाजांची संख्या 150 च्या पार जात असताना आणि 40 हून अधिक युद्धनौका देशांतर्गत गोदींमध्ये आकारास येत असताना, आयएनएस मंगरोलचे आगमन भारताच्या सागरी सीमा अभेद्य आणि सुरक्षित राहतील याचा भरवसा देते. उथळ पाण्यात शत्रूच्या पाणबुडीला शिरकाव करू न देण्याची ही भक्कम तटबंदी देशाच्या सागरी सार्वभौमत्वाची नवी ढाल ठरत आहे.





























































