इतकी वर्षे लोकांनी माझ्याविषयी लिहिलं, आता माझी बारी आहे! माझे आत्मचरित्र आल्यावर तमाशा तर होणारच! सोनिया गांधी यांची सूचक टिप्पणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांचे ‘बिलॉन्गिंग ः अ जर्नी ऑफ लव्ह’ हे आत्मचरित्र 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार आहे. ‘एक्स’ पोस्ट करून त्यांनी आज यासंदर्भात माहिती दिली. ‘इतकी वर्षे लोकांनी माझ्याविषयी त्यांच्या दृष्टिकोनातून लिहिलं, आता माझी बारी आहे. हे पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर काही ना काही तमाशा नक्की होणार,’ अशी सूचक टिप्पणीही त्यांनी केली.

पुस्तक प्रकाशनाच्या निमित्ताने सोनिया गांधी यांनी स्वतःच्या ‘एक्स’ हँडलवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्यांनी आत्मचरित्रामागील भूमिका विषद केली आहे. ‘गेली कित्येक वर्षे माझ्याबद्दल वेगवेगळय़ा प्रकारचे लिखाण करण्यात आले. त्यातले बरेचसे पूर्ण सत्य नव्हते. बहुतेक गोष्टी कपोलकल्पित आणि अतिशयोक्तीपूर्ण होत्या. त्यामुळे मला वाटले की आपणच आपली गोष्ट सांगावी आणि जे काही घडले ते जसेच्या तसे मांडावे. हे आत्मचरित्र म्हणजे माझी बाजू नाही. माझ्या आयुष्याची गोष्ट आहे,’ असे त्या म्हणाल्या.

माझ्याबद्दल वेगवेगळी मतं आहेत. या पुस्तकामुळं कदाचित काही मतं बदलतील, काही लोकांची मतं आणखी प्रतिकूल होतील. पण सार्वजनिक जीवनात हे होणं स्वाभाविक असतं.