
प्रसिद्ध व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी यांनी संपादित केलेल्या ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या आगळय़ावेगळय़ा पुस्तकाचे प्रकाशन गुरुवार, 29 ऑक्टोबर रोजी दादर शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात सायंकाळी 7 वाजता होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि सांस्कृतिक कार्यमंत्री अॅड. आशीष शेलार यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन होईल.
‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकात मराठी व्यंगचित्रकलेचा शतकभराचा आढावा घेण्यात आला आहे. गेल्या शंभर वर्षांतील मराठीतील प्रख्यात व्यंगचित्रकारांचा परिचय आणि त्यांची निवडक व्यंगचित्रे पुस्तकात आहेत. ‘ग्रंथाली’ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रकाशन सोहळय़ाला अनेक नामवंत व्यंगचित्रकारांची विशेष उपस्थिती असेल. सूत्रसंचालन डॉ. मृण्मयी भजक करतील. ग्रंथालीचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक अरुण जोशी यावेळी उपस्थित असतील. धनश्री धारप या कार्यक्रमाच्या संयोजक आहेत.
























































