पुन्हा नक्की भेटू  – नात्यांचा हळवा निरोप आणि पुन्हा भेटण्याची ओढ!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> पराग खोत

कुणाचाही निरोप घेताना आपण अगदी सहज म्हणतो, ‘पुन्हा नक्की भेटू!’ निरोपाच्या क्षणी उच्चारले जाणारे हे शब्द कधी औपचारिक असतात, तर कधी मनात दडलेल्या ओढीची, जिव्हाळ्याची आणि नातं टिकवून ठेवण्याच्या इच्छेची खूण असतात. भेटीची खात्री नसतानाही पुन्हा भेटण्याचं आश्वासन देणाऱ्या या शब्दांमध्ये माणसाच्या भावविश्वाचं एक मोठं गुपित दडलेलं असतं! याच भावनेचा धागा पकडून ‘पुन्हा नक्की भेटू’ हे नवं मराठी नाटक रंगभूमीवर आलं आहे. नात्यांमधले रुसवे-फुगवे, त्यातील हळवेपण, बोलता न आलेल्या भावना आणि पुन्हा एकत्र येण्याची ओढ यांना नीटपणे गुंफून रंगमंचावर आणण्याचा प्रयत्न या नाटकातून केला आहे.

नात्यांची गोष्ट सांगताना त्यातला सहजपणा आणि भावनिक प्रामाणिकपणा टिकवणं हे खऱया अर्थानं आव्हान असतं. कारण आयुष्याच्या नाटय़ात प्रत्येकजण कधी नायक असतो, कधी खलनायक, तर कधी केवळ समोरच्याच्या मनात आपल्यासाठी जागा आहे की नाही? याचा अंदाज घेणारं एक पात्र. ‘पुन्हा नक्की भेटू’ या नाटकाचं शीर्षकच प्रेक्षकांना आपल्या आयुष्यातील अशाच अनेक भेटींची आणि निरोपांची आठवण करून देतं. कुठल्याही नात्याला पूर्णविराम देण्यापेक्षा त्यापुढे स्वल्पविराम द्यावा ही मानसिकता मांडणारी ही थीम आहे आणि नात्यांचा हाच हळवा पदर नाटकाचा महत्त्वाचा आकर्षणबिंदू ठरतो.

पूर्वा, अभिजीत आणि प्रमोद हे तीन जिवश्च मित्र. वेगवेगळ्या शहरांतून कला महाविद्यालयात शिकायला आलेल्या ह्या तिघांची पूर्वायुष्यं एकमेकांशी घट्ट जोडलेली आहेत. तिथून बाहेर पडल्यानंतर त्यांचा स्वतंत्र प्रवास सुरु होतो आणि काही वर्षांनी ते तिघे पुन्हा भेटल्यावर जे घडते, जे दिसते आणि जे उमगते ते म्हणजे हे नाटक. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात घडलेल्या काही घटनांचा थेट संदर्भ ह्या नाटकात आढळतो आणि त्यामुळे हे नाटक हळूहळू अधिकच जवळचं वाटायला लागतं. मैत्रीचा गहिरा अर्थ हे नाटक उलगडून दाखवतं. कविता ही प्रमोदची पूर्वाश्रमीची मैत्रीण आणि आताची बायको त्यांच्यासोबतच आहे. या चौघांनी त्यांच्या आयुष्यातला सोनेरी काळ एकत्र घालवला आहे. आता पाच-सहा वर्षांनी पुन्हा एकदा भेटल्यावर त्यांच्यामधील ते सूक्ष्म अनुबंध जुळून येतात आणि त्यातून एक सशक्त आणि तितकंच तरल नाटय़ निर्माण होतं जे आपल्याला अडीच तीन तास गुंतवून ठेवतं.

या नाटकाचा सर्वात मोठा हायपॉईंट म्हणजे अभिनेत्री मुक्ता बर्वे. मुक्ता हा एक ब्रॅंड आहे. तिच्या अभिनयातील सहजता आणि आश्वासक वावर, व्यक्तिरेखेच्या अंतरंगात शिरण्याची तिची हातोटी आणि भावनिक प्रसंगांवरची पकड यामुळे ती अवकाश भरुन टाकते. दुसरीकडे, प्रियदर्शन जाधवने अंगिकारलेल्या खास शैलीतून प्रसंगांना मिश्किलपणा आणि कथेला अनपेक्षित वळणं मिळत जातात. ही जोडी रंगभूमीवर प्रथमच एकत्र येतेय. अभिनयाच्या या दोन भिन्न प्रकृतींची सांगड घालण्याचा हा प्रयत्न किती रंगतो, यावर या नाटकाचे यश अवलंबून आहे. आरती वडगबाळकर आणि अंशुमन विचारे ही दुसरी जोडीही लक्षवेधी आहे. अंशुमनच्या विनोदी टायमिंगला आरतीच्या सहज अभिनयाची साथ मिळाल्याने नात्यांमधील गंमत अधिक खुलते. मात्र, केवळ कलाकारांची लोकप्रियता किंवा नव्या जोडय़ांचं कुतूहल एवढयावर नाटकाचं यश ठरत नाही. व्यक्तिरेखांना मिळालेली खोली, प्रसंगांची बांधणी आणि विनोदातून भावनेपर्यंत होणारा प्रवास यांची सांगड महत्त्वाची असते आणि इथे ती नीट घातली गेली आहे.

लेखक देबू बर्वे यांच्यासाठी हे नाटक विशेष आहे. कॉर्पोरेट क्षेत्रात कार्यरत असलेल्या देबू यांच्या लेखणीतून साकारलेली ही संहिता म्हणजे एका नव्या कलागुणाचा रंगमंचावर झालेला प्रवेश आहे. नात्यांमधील सूक्ष्म छटा, संवादांमधील सहजता आणि प्रसंगांमधील नाटय़ यांवर लेखनाची खरी कसोटी लागते आणि लेखक देबू बर्वे यांचे हे पदार्पण निश्चितच दमदार ठरले आहे. दिग्दर्शिका मीरा वेलणकर यांच्यासाठी हा प्रयोग आणखी एका कारणानं महत्त्वाचा आहे. मुक्ता बर्वेसोबतची पंचवीस वर्षांची मैत्री जपत त्या पहिल्यांदाच नाटय़निर्मितीच्या क्षेत्रात उतरल्या आहेत. ‘रंगमाया’ या नव्या नाटय़संस्थेची सुरुवातही या नाटकातून होत आहे. मैत्री आणि व्यावसायिक सहकार्य यांच्यात समतोल राखत कलाकारांकडून सर्वोत्तम काम करून घेणं, हे दिग्दर्शकाचं कौशल्य असतं. मीराच्या कलात्मक दृष्टिकोनाचं आणि संवेदनशीलतेचं प्रतिबिंब ह्या नाटकात दिसून येतं. प्रत्येक गोष्टीचं केलेलं अफाट डिटेलिंग हे या नाटकाचं वैशिष्टय़ आहे. पडदा उघडतानाच नजरेत आणि मनात भरणारं प्रदीप मुळ्ये यांचं भव्य आणि कलात्मक नेपथ्य या नाटकाला वेगळी उंची देतं. वैभव जोशी यांची गीतरचना, श्रीनाथ म्हात्रे यांचं संगीत आणि संतोष जगदाळे यांचं पार्श्वसंगीत यामुळे नाटकाला तांत्रिकदृष्टय़ा समृद्ध करणारी अनुभवी टीम लाभली आहे.

एकूणच, ‘पुन्हा नक्की भेटू’ हे शीर्षक केवळ निरोपापुरतं मर्यादित राहत नाही; ते नात्यांना आणखी एक संधी देण्याची आठवण करून देतं. नव्या जोडया, नात्यांच्या भावविश्वाचा विषय आणि मैत्रीतून आकाराला आलेला सर्जनशील प्रवास यांमुळे या नाटकाभोवती उत्सुकता निर्माण होत जाते. या उत्सुकतेचं समाधान, नाटकाची प्रत्यक्ष रंगमंचीय मांडणी, प्रसंगांची परिणामकारकता आणि कलाकारांचा अभिनय करतो हे नक्की. नाटक संपल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात जर एखाद्या जुन्या मित्राला फोन करण्याची, दुरावलेल्या माणसाला भेटण्याची किंवा एखादं अपुरं नातं पुन्हा जोडण्याची इच्छा निर्माण झाली, तर ह्या नाटकाचा हेतू सफल झाला असं म्हणता येईल आणि प्रेक्षकच ह्या नाटकाला म्हणतील ‘पुन्हा नक्की भेटू’.

लेखक – देबू बर्वे

दिग्दर्शिका – मीरा वेलणकर

कलाकार – प्रियदर्शन जाधव, अंशुमन विचारे, आरती वडगबाळकर आणि मुक्ता बर्वे

नेपथ्य आणि प्रकाशयोजना – प्रदीप मुळ्ये

गीत – वैभव जोशी

संगीत – श्रीनाथ म्हात्रे

पार्श्वसंगीत – संतोष जगदाळे

निर्माता – दिलीप जाधव, मुक्ता बर्वे, मीरा वेलणकर

निर्मिती संस्था – अष्टविनायक आणि रंगमाया

सूत्रधार – प्रणित बोडके

छायाचित्र सौजन्य – संजय पेठे