
नागमोडी वळणे घेत धुरांच्या रेषा हवेत सोडत ‘राणी’ची निसर्गरम्य माथेरानमध्ये शाही एण्ट्री झाली आणि टाळ्यांचा एकच कडकडाट करण्यात आला. बच्चेकंपनीपासून आजी-आजोबांपर्यंत सर्वांनी आवडत्या राणीला उपस्थितांनी मुजरा केला. तब्बल चार महिन्यांच्या सुट्टीनंतर ही टॉयट्रेन पुन्हा ड्युटीवर हजर झाली असून दिवाळीच्या सुट्टीत त्यातून सफर करण्याचा आनंद पर्यटकांना घेता येणार आहे. त्यामुळे माथेरानच्या पर्यटनाला चालना मिळेल, असा विश्वास स्थानिकांनी व्यक्त केला.
निसर्गरम्य माथेरानमधील पॉइंट्स पाहण्यासाठी महाराष्ट्रासह देशभरातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. शंभरहून अधिक वर्षे धावणारी टॉयट्रेन हे माथेरानचे मुख्य आकर्षण आहे. पावसाळ्याच्या सुट्टीत ही ट्रेन बंद असते. आजपासून पुन्हा ही ट्रेन प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली. नेरळ स्थानकाहून आज सकाळी ८.५० वाजता या गाडीला स्थानक प्रबंधक गुरुनाथ पाटील यांनी हिरवा झेंडा दाखवला आणि सुरू झाला नागमोडी वळणाचा प्रवास. खोल दरी आणि हिरवाई असे मनमोहक दृश्य पर्यटकांना ट्रेनमधून दिसत होते.
उद्योगांना मिळणार चालना
फुलांनी सजवलेली टॉयट्रेन मजल दरमजल करीत माथेरान स्थानकात आली तेव्हा फलाटावरील रेल्वेचे कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नागरिकांनी तिचे उत्स्फूर्त स्वागत केले. लोकोपायलट नरेश भोईर व गार्ड मंजिद कुमार यांनी सारथ्य केले. संजीवकुमार यादव, सौरभ कुमार, शरद सानप यांच्यासह अनेकजण यावेळी उपस्थित होते. माथेरानची राणी सुरू झाल्याने पर्यटकांची संख्या वाढून स्थानिक उद्योगालादेखील चालना मिळणार आहे.
टॉयट्रेनमध्ये सहा डब्यांची रचना असून प्रथम श्रेणीचा एक डबा पर्यटकांसाठी उपलब्ध आहे. विशेष म्हणजे मोठ्या काचेच्या खिडक्या आणि काचेच्या छताने सजलेला व्हिस्टाडोम डबा पर्यटकांचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे.
नेरळ ते माथेरान या फेरीशिवाय अमन लॉज ते माथेरान यादरम्यान शटल सेवाही सुरू करण्यात आली आहे.



























































