
नीलेश कुलकर्णी
चार राज्यांमध्ये विधान परिषदेच्या निवडणुका झाल्या. त्यात काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली म्हणून भाजपच्या गोटात आनंदाच्या उकळ्या फुटत असल्या तरी प्रत्यक्षात उकळ्या विरोधी पक्षांना फुटायला हव्यात अशी स्थिती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या वाराणसीचे खासदार आहेत तिथे भाजपला पराभवाची धूळ चाखावी लागली आहे. योगी आदित्यनाथांनी प्रशासकीय यंत्रणेवर दबाव आणून कशीबशी आपली गोरखपूरची गादी वाचवून मोदींचे नाक कसे कापले जाईल याची व्यवस्था केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. ‘मोदीमुक्त’ वाराणसी हा भाजपसाठी आगामी निवडणुकीच्या तोंडावर गंभीर इशारा आहे.
चार राज्यांतील विधान परिषद निवडणुकीत भाजपचे घटक पक्ष खरे लाभार्थी ठरले. या निवडणुकीत भाजपच्या पदरात फक्त एक अतिरिक्त जागा पडली तर काँग्रेसला फक्त एकच जागा मिळाली. देशभरात नरेंद्र मोदींविरोधात आक्रोश आहे. राहुल गांधी सरकारविरोधात रान उठवील आहेत. असे असताना काँग्रेस कार्यकर्ते त्याचे रूपांतर मतपेटीत का करू शकत नाहीत यावर काँग्रेसने चिंतन करायला हवे. कर्नाटकसारख्या खरगेंच्या गृहराज्यात सत्ता असूनही काँग्रेसची जी दाणादाण उडाली आणि पुट्टना यांच्यासारख्या सलग पाच वेळा आमदार राहिलेल्या दिग्गजाचा जो बंगळुरूमध्ये पराभव झाला त्याकडे त्या पक्षाने गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. 28 जागांपैकी फक्त एका जागी काँग्रेसचा विजय झाला आहे हे कटू आहे, पण वास्तव आहे. अर्थात सध्या कर्नाटकपेक्षाही उत्तर प्रदेशची चर्चा अधिक आहे. कारण उत्तर प्रदेश हे देशाचा पंतप्रधान ठरविणारे महत्त्वाचे राज्य आहे. या राज्यात सध्या गुजरात लॉबी विरुद्ध योगीबाबा यांच्यात उघड ‘गँगवॉर’ सुरू झाले आहे. विधान परिषदेची निवडणूक ही ‘भाजप विरुद्ध भाजप’ अशी लढली गेली. या खेळात तूर्तास तरी योगींनी मोदींवर मात केली आहे. पंतप्रधानांच्या मतदारसंघातच भाजपची दाणादाण उडालेली आहे. भाजपचे ढोंगी हिंदुत्व व पोकळ घोषणांना जनता कंटाळली आहे. विधान परिषद निवडणुकीचा तोच संदेश आहे. गतवेळेपेक्षा फक्त एकच जागा आपल्याला जास्त कशी मिळाली यावर भाजपने मनन, चिंतन करावे.
‘डिलीट’ची नामुष्की
विधान परिषद निवडणुकीत चार राज्यांतील निकाल येण्याच्या अगोदरच पंतप्रधानांनी एक ट्विट केले आणि नंतर ते डिलीट करावे लागले. पंतप्रधानांवर ही नामुष्की पहिल्यांदाच ओढवली. वास्तविक, देशाचे पंतप्रधान म्हणून जी भाषा वापरायला नको ती भाषा मोदींनी अनेकदा वापरली. शशी थरूर यांना उद्देशून म्हटलेले ‘50 करोड की गर्लफ्रेंड’ हे वानगीदाखल उदाहरण. देशाच्या आजवरच्या पंतप्रधानांनी कधीही अशी भाषा वापरली नाही. मात्र, मोदींचेच एक्स अकाऊंट मात्र तुलनेने सर्व प्रकारच्या सभ्यता पाळून आजवर राहिले. हे अकाऊंट जे कोणी चालवत असतील त्या सद्गृहस्थांनी आजवर एकदाही विरोधी पक्षांवर याद्वारे साधा कटाक्षही केला नव्हता. मात्र, वाराणसीमध्ये भाजपचा दारुण पराभव झाल्यामुळे असेल कदाचित, या अकाऊंटची सदसद्विवेकबुद्धी ढळली असे म्हणावे लागेल. या अकाऊंटवरून काँग्रेसला खिजवणारी पोस्ट करण्यात आली. त्यात ‘बॅलेट पेपरवर निवडणुका होऊनही काँग्रेसला किती जागा मिळाल्या, तर फक्त झीरो!’ अशी इमोजी पंतप्रधानांच्या नावाने टाकण्यात आली. सगळ्या भक्तजनांनी हे ट्विट लाईक, रिट्विट केले. मात्र, अवघ्या काही कालावधीत नागपूरचा निकाल आला आणि पंतप्रधानांचे हे ट्विट डिलीट करण्याची नामुष्की आली. राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमध्ये विजयाचा बहुधा पंतप्रधानांना विश्वास असावा. मात्र नागपूरमध्येच घात झाला आणि मध्यरात्री काँग्रेस उमेदवार निवडून आला. बारा वर्षांत मोदी पाळत नसलेली सभ्यता त्यांचे एक्स अकाऊंट पाळत होते, त्या अकाऊंटलाही नामुष्की पत्करावी लागली
अवघड जागचे दुखणे
‘एपस्टीन फेम’ हरदीप पुरींना राज्यसभेवर संधी नाकारली गेली. किमान लोकलज्जेस्तव मोदींनी पुरी यांना दूर ठेवले, असे त्यावेळी बोलले गेले. मात्र अमेरिकन परराष्ट्रमंत्री हिंदुस्थान दौऱ्यावर आल्यानंतर याच पुरींचे भाग्य ‘360 डिग्री’ने असे काही फिरले की, विचारायला नको. उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका तोंडावर आहेत. सामाजिक समीकरणे महत्त्वाची असे कारण सांगून पुरी यांना उमेदवारी नाकारली, असा तर्क त्यावेळी भाजपकडून दिला गेला होता. हरदीप यांना पेंद्रीय मंत्रिमंडळातून नारळ दिला जाईल, असे सांगितले गेले. मात्र, झाले उलटेच. ज्यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेसाठी नाकारले गेले त्यांच्यासाठी मध्य प्रदेशमध्ये पायघडय़ा घातल्या गेल्या. त्यासाठी केंद्रीय मंत्री मुरगन यांचा ‘बळी’ चढविण्यात आला. त्यांच्याकडून राज्यसभेचा राजीनामाही लिहून घेण्यात आला. ही किमया पुरी यांच्या एपस्टीनसोबतच्या त्या फोटोने केली. या फोटो व्हायरल झाल्यावर खरे तर पुरी अधिक अडचणीत यायला पाहिजे होते. मात्र हाच फोटो त्यांच्यासाठी वरदान व ‘राजकीय जीवनदान’ देणारा ठरला. या आणि अशा अनेकांच्या फोटोंचा पिटारा पुरी यांच्याकडे असल्याचे बोलले जात आहे. ‘अमेरिकेच्या दबावापुढे आम्ही झुकत नाही, हे दाखवून देण्यासाठी पुरी यांना उमेदवारी दिल्याचा’ अजब दावा भाजप आता करत आहे. मग उत्तर प्रदेशातून उमेदवारी नाकारताना अमेरिकेचा दबाव नव्हता का, असा प्रश्न निर्माण होतो. पुरी स्वस्तात निपटले जातील असे वाटले होते. मात्र, हरदीप पुरी हे याबाबतीत महावस्ताद ठरले. अमेरिका दबाव वगैरे सफेद झूठ आहे. बाकी ‘ये पब्लिक है, सब जानती है!’





























































