शहापूरच्या बांधकाम विभागात एफडी घोटाळा; पावत्या बोगस, अधीक्षक अभियंत्यांनी दिले चौकशीचे आदेश

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

 भिवंडी तालुक्यात पूल उभारण्याचा ठेका मिळालेल्या एका ठेकेदाराने बँकेत ठेवलेली एफडी (मुदत ठेव) बोगस असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. या एफडी घोटाळ्याने शहापूरच्या बांधकाम विभागात खळबळ उडाली असून अधीक्षक अभियंत्यांनी चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहेत. अतुल चौधरी असे या घोटाळेबाज ठेकेदाराचे नाव असून त्याचीही चौकशी केली जाणार आहे.

भिवंडी तालुक्यातील कुंदे वडाचा ते कुंदेपाडा या ग्रामीण मार्ग क्रमांक ४० वर पूल उभारण्याचे कंट्रात अतुल चौधरी यांना देण्यात आली होती. हा ठेका २ कोटी रुपयांचा होता. या कामासाठी त्यांनी स्टेट बँकेच्या वाडा शाखेत ६४ लाख रुपयांची एफडी अनामत रक्कम म्हणून ठेवली होती. एफडीची ही पावती बोगस असल्याची तक्रार गजानन कन्स्ट्रक्शनचे दिनेश देशमुख यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली होती. मात्र त्याकडे सप्शेल दुर्लक्ष करण्यात आले.

 बारा वेळा पत्रव्यवहार

माहिती अधिकाराच्या माध्यमातून पाठपुरावा केल्यानंतर ठेकेदार अतुल चौधरी यांची एफडी खरेदी नसल्याचे निष्पन्न झाले. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही त्यास दुजोरा दिला असल्याचे चौधरी यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी अभियंत्यांकडे बारा वेळा पत्रव्यवहार करूनही कोणतीही ठोस कारवाई झाली नाही. तक्रारदारांनी आवाज उठवल्यानंतर बांधकाम विभागाच्या ठाणे मंडळातील अधीक्षक अभियंता सिद्धार्थ तांबे यांनी कार्यकारी अभियंता सुनील पाटील यांना सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. एफडी घोटाळा उघडकीस आल्यानंतर दोषींवर काय कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.