
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) घेण्यात येणाऱया महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2026 मधील पदसंख्येत मोठी वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी 5 हजार 707 पदांसाठी जाहीर झालेल्या या परीक्षेत आता आणखी 11 हजार 10 पदांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे आता एकूण 16 हजार 717 पदे भरली जाणार आहेत.
यासंदर्भातील शुद्धिपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. राज्यातील भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व सुरक्षित करण्यासाठी राज्य शासनाने स्थापन केलेल्या उच्चस्तरीय समितीने सादर केलेल्या अंतरिम अहवालातील शिफारशींच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.
13 ते 27 नोव्हेंबरदरम्यान अर्ज सादर करता येणार
वाढीव पदसंख्येच्या अनुषंगाने उमेदवारांना नव्याने अर्ज सादर करण्याची संधी देण्यात येणार आहे. तसेच यापूर्वी अर्ज केलेल्या आणि शैक्षणिक पात्रतेनुसार नव्याने समाविष्ट झालेल्या एकापेक्षा अधिक संवर्गांसाठी पात्र असलेल्या उमेदवारांना पर्याय सादर करता येणार आहेत. त्यासाठी नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही. नव्याने अर्ज तसेच विकल्प सादर करण्यासाठी 13 ते 27 नोव्हेंबर 2026 या कालावधीत आयोगाच्या संकेतस्थळावर लिंक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
































































