
पालिकेच्या उत्तन येथील धावगी घनकचरा प्रकल्पात शनिवारी सायंकाळी 4 वाजता पुन्हा एकदा आगीचा जोरदार भडका उडाला. ही आग इतकी भयंकर होती की आगीच्या ज्वाळा आणि धुराच्या लोटांनी उत्तनचे आकाश अक्षरशः काळवंडले होते. यामुळे उत्तनसह डोंगरी, तरोडी, धावणी या गावातील अनेक ग्रामस्थ घुसमटून गेले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 25 जवानांसह पालिकेच्या 10 अधिकारी-कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन रात्री उशिरा आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र आज 24 तास उलटले तरी मिशन कुलिंगचे काम सुरूच होते.
धावगी येथील घनकचरा प्रकल्पातील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला अचानक आग लागली. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि धुराचे प्रचंड लोट आकाशात पसरू लागले. या धुरामुळे उत्तन परिसरातील आसपासच्या गावांमधील नागरिकांची अक्षरशः घुसमट झाली. घरांमध्येही धुराचा शिरकाव झाल्याने लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना त्रास सहन करावा लागला. आगीची माहिती मिळताच मीरा भाईंदर महापालिकेचे अग्निशमन दल आणि पाण्याचे टैंकर घटनास्थळी दाखल झाले. आग नियंत्रणात आणण्यासाठी अग्निशमन जवानांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू करण्यात आले. जवळपास 100 टँकर पाण्याचा मारा केल्याने रात्री उशिरा ही आग आटोक्यात आली.
आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
उत्तनच्या धावगी परिसरातील या डंपिंग ग्राउंडचा त्रास स्थानिकांना अनेक वर्षांपासून सहन करावा लागत आहे. पालिकेने 2005 मध्ये सुमारे 70 एकर जागेवर हा घनकचरा प्रकल्प सुरू केला. मात्र कचऱ्यावर पुरेशी शास्त्रोक्त प्रक्रिया होत नसल्याने वर्षानुवर्षे कचऱ्याचे मोठमोठे डोंगर तयार झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे. या कचऱ्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत असतानाच आता वारंवार लागणाऱ्या आगींमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असून श्वसनाचे विकार, डोळ्यांची जळजळ आणि खोकल्याचा त्रास होण्याची भीती आहे.


























































