
अभ्युदय नगर या म्हाडा वसाहतीच्या पुनर्विकासासाठी विकासकाला 51 टक्के रहिवाशांची संमतीपत्रे म्हाडाकडे सादर करणे बंधनकारक आहे. मात्र दिलेल्या मुदतीत संमतीपत्रे सादर करण्यास विकासक अपयशी ठरला असून विकासकाने म्हाडाकडे आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मागितली आहे. त्यामुळे अभ्युदय नगरचा पुनर्विकास लांबणीवर पडण्याची चिन्हे आहेत. पुनर्विकासामुळे रहिवाशांना 210 चौरस फुटांच्या घराच्या मोबदल्यात 641 चौरस फुटांचे प्रशस्त घर मिळणार आहे.
अभ्युदय नगर म्हाडा वसाहत सुमारे 33 एकर जागेत वसलेली आहे. या वसाहतीत 48 इमारती असून त्यामध्ये 3335 घरांचा आणि 75 दुकानांचा समावेश आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या या वसाहतीच्या पुनर्विकासाची जबाबदारी राज्य सरकारने म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपविली. म्हाडाने बांधकाम व विकास तत्त्वावर या वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार एम. जी. एन. अॅग्रो प्रॉपर्टीज, एन. एन. पी. बिल्डकॉन आणि ओनेस्ट शेल्टर्स यांची नियुक्ती करण्यात आली.
विकासक पंपनीला मे महिन्यात म्हाडाने स्वीकृती पत्र दिले होते आणि नियमानुसार त्यांना 51 टक्के रहिवाशांची संमतीपत्रे सादर करण्याची अट घातली होती. ही मुदत नुकतीच संपली असून संमतीपत्रे सादर करण्यात विकासक अपयशी ठरला आहे. त्यामुळे आणखी तीन महिन्यांची मुदतवाढ मिळावी, अशी विनंती विकासकाकडून म्हाडाकडे करण्यात आली आहे.
























































