
कच्च्या तेलापासून पेट्रोल, डिझेल, विमानांचे इंधन आणि इतर पदार्थ तयार करण्यासाठी तेलशुद्धीकरण कारखान्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर उष्णता वापरली जाते. तेल वेगवेगळय़ा तापमानांवर गरम करून त्यातील घटक वेगळे करण्याची ही पद्धत अनेक दशकांपासून वापरात आहे. मात्र या प्रक्रियेला प्रचंड ऊर्जा लागते आणि त्यामुळे कार्बन उत्सर्जनही वाढते. आता याला पर्याय ठरू शकणारे तंत्रज्ञान संशोधकांनी विकसित केले आहे. दक्षिण कोरियातील कोरिया ऍडव्हान्स्ड इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्स ऍण्ड टेक्नॉलॉजी आणि अमेरिकेतील जॉर्जिया टेकमधील संशोधकांनी एक विशेष पॉलिमर पडदा तयार केला आहे. या पडद्यातून कच्चे तेल खोलीच्या तापमानावर दाबाखाली प्रवाहित केले जाते. त्यातील हलके घटक पडद्याच्या अतिसूक्ष्म छिद्रांतून पुढे जातात, तर जड घटक मागे राहतात. त्यामुळे नॅप्था आणि रॉकेलसारखे घटक वेगळे करण्यास मदत होते.
या संशोधनातील आश्चर्यकारक बाब म्हणजे तेलातील जड रेणूच पडद्याच्या छिद्रांमध्ये साचून त्यांचे आकार आणखी लहान करतात. त्यामुळे हलक्या रेणूंना जाण्यासाठी सूक्ष्म मार्ग तयार होतात. साधारणपणे गाळ साचणे ही गाळणीसाठी अडचण मानली जाते, पण येथे त्याचाच उपयोग विभाजन अधिक प्रभावी करण्यासाठी झाला. प्रत्यक्ष कच्च्या तेलावर केलेल्या प्रयोगांत हा पडदा सलग चार आठवडे स्थिर काम करत असल्याचे संशोधकांनी नोंदवले. ‘नेचर’ या संशोधनपत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासानुसार, या पडद्याचा वापर पारंपरिक ऊर्ध्वपातनाच्या आधी केल्यास ऊर्जेची गरज सुमारे 31.6 टक्क्यांनी आणि कार्बन डायऑक्साइड उत्सर्जन 37.6 टक्क्यांनी कमी होऊ शकते. हे आकडे औद्योगिक प्रक्रियेच्या संगणकीय अंदाजांवर आधारित आहेत; प्रत्यक्ष मोठय़ा कारखान्यांतील वापरासाठी अजून चाचण्या आवश्यक आहेत.
हे तंत्रज्ञान लगेच सर्व तेलशुद्धीकरण कारखान्यांत वापरले जाईल असे नाही. मोठय़ा प्रमाणावर पडदे तयार करणे, त्यांची टिकण्याची क्षमता तपासणे आणि विद्यमान यंत्रणेत त्यांचा समावेश करणे ही पुढची आव्हाने आहेत. तरीही कमी ऊर्जेत तेलाचे घटक वेगळे करण्याची ही दिशा महत्त्वाची मानली जात आहे.
स्पायडरमॅन





























































