पोलीस पडताळणी आता 21 दिवसांत होणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पोलीस परवानग्या मिळवण्यात खूप वेळ वाया जातो. अनेकदा पोलिसांना वेगवेगळय़ा मार्गाने खूश करावे लागते. पण आता परवानग्यांची प्रक्रिया सुटसुटीत करण्याचा निर्णय राज्याच्या गृह विभागाने घेतला असून अर्जातील माहिती भरण्याच्या नोंदींची संख्या 478 वरून 268 केली, तर आवश्यक कागदपत्रांची संख्या 205 वरून 121 पर्यंत कमी केली आहे. मंजुरीसाठीचे कार्यालयीन टप्पेही कमी करून पोलीस पडताळणी प्रमाणपत्रासाठीची कालमर्यादा 30 दिवसांवरून 21 दिवस करण्यात आली आहे. शासनाच्या शासकीय प्रक्रिया पुनर्रचना उपक्रमांतर्गत हा बदल करण्यात आला आहे. गृह विभागाच्या सेवा हमी कायद्यांतर्गत यापूर्वी अधिसूचित सेवांचे सुसूत्रीकरण करून समान स्वरूपाच्या सेवांचे एकत्रीकरण आणि अनावश्यक सेवा वगळण्यास मान्यता देण्यात आली आहे.