
बुलढाणा जिह्यातील लोणार सरोवराचा इंटरनॅशनल युनियन ऑफ जिओलॉजिकल सायन्सेसच्या (IUGS) ‘थर्ड 100
जिओलॉजिकल हेरिटेज साइट्स’च्या यादीत समावेश झाला आहे. या यादीत स्थान मिळवणारे लोणार हे हिंदुस्थानातील दुसरे ठिकाण आहे. ‘थर्ड 100’मध्ये 47 देशांतील स्थळांचा समावेश आहे. या मान्यतेमुळे पर्यटन, संशोधन आणि स्थानिक रोजगाराच्या संधी वाढण्याची अपेक्षा आहे.
सुमारे 12 हजार वर्षांपूर्वी उल्कापातामुळे लोणार सरोवर तयार झाले. दख्खनच्या बेसाल्ट खडकांमध्ये असलेल्या या विवराचा व्यास सुमारे 1.88 किलोमीटर आहे. बेसाल्टमध्ये तयार झालेल्या अतिवेगाच्या उल्काविवरांपैकी जगातील केवळ पाच ज्ञात उदाहरणांत लोणारचा समावेश होतो. विवरातील पाणी खारे आणि अल्कधर्मी आहे. त्यामुळे त्याची भूगर्भीय, रासायनिक आणि जैविक वैशिष्टय़े अभ्यासकांसाठी महत्त्वाची आहेत. लोणारला यापूर्वी रामसर स्थळ आणि राष्ट्रीय भूगर्भीय वारसा स्मारकाचा दर्जा मिळाला आहे. पोर्तुगालमधील अल्गार्वे येथे झालेल्या कार्यक्रमात अंतिम निवड जाहीर झाली.




























































