जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीतील उमेदवार व शिंदे गटाचे आमदार किशोर पाटील यांचे पुत्र सुमित पाटील यांचा अर्ज माझ्यामुळेच बाद झाला आणि नंतर माझ्यामुळेच वैध ठरला, अशी जाहीर कबुली भाजप आमदार मंगेश पाटील यांनी दिली. त्यावरून संतप्त झालेल्या आमदार पुत्र सुमित पाटील यांनी मंगेश पाटील यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याने जळगावात भाजप आणि शिंदे गटात चांगलीच जुंपली आहे.
भाजप आमदार मंगेश चव्हाण हे महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकत असून येत्या काळात त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ, त्यांची तक्रार आपण भाजप नेते गिरीश महाजन यांच्याकडे करणार आहोत, असा इशाराही सुमित पाटील यांनी दिला. त्यावर आमदार मंगेश चव्हाण यांनी मी लेचापेचा कार्यकर्ता नाही, आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय ठेवून जायची माझी ताकद आहे, असे म्हणत मंगेश चव्हाण यांनी सुमित पाटील यांची लायकी 30 तारखेला दिसेल, असे आव्हान यावेळी दिले. पाठीत खंजीर कुणी खुपसला तर मंगेश चव्हाण कसा हिशेब करतो ते पहा, अशी इशारावजा धमकीही त्यांनी दिली.



























































