
दुष्काळासाठी राज्य सरकारने केंद्राकडे 29 हजार कोटी रुपयांची मागणी केली होती. मात्र, केंद्राकडून केवळ 1 हजार कोटींची मदत मिळाली आहे. यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारला फटकारले. देवेंद्र फडणवीस यांना हे सांगू इच्छितो की, केंद्र सरकार तुम्हाला एक दमडीही देणार नाही, अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. हा दुष्काळ जर गुजरात, बिहार किंवा योगी आदित्यनाथ यांच्या राज्यात पडला असता तर, आत्तापर्यंत 1 लाख कोटी रुपये पोहोचले असते, असेही ते यावेळी म्हणाले.
मुंबईमध्ये काही खास बिल्डरांच्या माध्यमातून एसआरए घोटाळा सुरू असून, या नामांकित बिल्डरांनी महाराष्ट्राचा 40 ते 50 हजार कोटी रुपयांचा महसूल बुडवला आहे. राज्याचे मुख्यमंत्री झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाचे अध्यक्ष आहेत आणि त्यांच्या अध्यक्षतेखालील संस्थेत इतका मोठा भ्रष्टाचार झाला आहे. बिल्डरांकडून हा पैसा वसूल करून तो दुष्काळग्रस्तांसाठी वापरावा. कारण केंद्राकडून एक दमडीही मिळणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
केंद्राने दिलेले हे 1 हजार कोटी रुपयेही चार ते पाच टप्प्यांत मिळणार आहेत आणि 40 हजार कोटी मिळेपर्यंत पुढला पावसाळा उजाडेल किंवा ते मिळणारच नाहीत. त्यामुळे मुंबईत बिल्डरांनी बुडवलेले पैसे घ्या, असे म्हणत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
बिल्डरांशी संबध असल्याच्या भाजपच्या आरोपांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, मी आयुष्यात नेहमी काम केले आहे, धंदा केलेला नाही; कोणत्याही बिल्डरला कधी भेटलो नाही आणि भेटतही नाही. मराठी माणसाने धंदा केला तर यांच्या पोटात का दुखते? कंबोज, अनंत पंडित, सोमय्या, लोढा, रहेजा यांच्यामध्ये भोसले, पाटील, कुलकर्णी, जाधव अशी नावे आली तर पोटात का दुखते, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.


























































