व्हॉट्सअॅप वेब हॅक होण्याचा धोका, काम झाल्यास लगेच लॉगआऊट करा; सरकारने दिला इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानात कोट्यवधी लोक व्हॉट्सअॅपचा वापर करतात. मोबाईल अॅपसह वेब व्हर्जनदेखील लाखो लोक वापरतात, मात्र या वेब व्हर्जनबाबत केंद्रीय गृह मंत्रालयाने एक अलर्ट जारी केला असून तुमच्या संगणकावर व्हॉट्सअॅप वेब सुरू ठेवून जाऊ नका, तेथून तुमचे व्हॉट्सअॅप खाते हॅक होण्याचा धोका आहे, असे या इशाऱ्यात म्हटले आहे.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सायबर क्राईम युनिटने एक अॅडवायजरी जारी केली असून त्यात हा इशारा दिला आहे. त्यात म्हटले आहे की, व्हॉट्सअॅप वेब हॅक होण्याचा धोका असून सायबर भामटे तुमचे खाते बळकावू शकतात. त्यामुळे व्हॉट्सअॅप वेबवर संवेदनशील माहिती शेअर करू नये तसेच आर्थिक व्यवहाराशी संबंधी कोणतेही काम करू नये, असा इशारा देण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, अनेक जण व्हॉट्सअॅप वेबमधून लॉगआऊट करत नाहीत, मात्र काम झाले की लॉगआऊट अवश्य करावे आणि सायबर कॅफेसारख्या ठिकाणी त्याचा वापर टाळावा, असा सल्लाही देण्यात आला आहे.

कोणते धोके आहेत?

व्हॉट्सअॅप वेब हॅक होण्याचा जास्त धोका आहे. हॅक झाल्यास तुमचे चॅट वाचणे, आर्थिक फसवणूक, फिशिंग अर्थात तुमच्या खात्याचा वापर करून दुसऱ्यांना बनावट लिंक किंवा मेसेज पाठवणे, तुमच्या निकटवर्तीयांचे मोबाईल क्रमांक मिळवणे आदी धोके आहेत. या माध्यमातून संगणकात व्हायरसदेखील सोडला जाऊ शकतो.