
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) औषध निरीक्षक पदाच्या भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणात मुंबई गुन्हे शाखेने दाखल केलेल्या पहिल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. आयोगातील एका सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याने प्रश्नपेढीतील सुमारे ३०० प्रश्न स्वतःच्या लॅपटॉपवर टाईप केले. त्यानंतर त्यांची प्रिंट काढून नवी मुंबईतील आयोगाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली, असा आरोप आरोपपत्रात करण्यात आला आहे.
लोकसत्ता ने दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात सहाय्यक कक्ष अधिकारी विश्वेश्वर नाकते याला मुख्य सूत्रधार ठरवण्यात आले आहे. पेपरफुटीचा प्रकार उघडकीस आल्यास वरिष्ठ अधिकाऱ्याचे संरक्षण मिळावे, या उद्देशाने नाकते याने आयोगातील अवर सचिव अभिजित लेंडवे यालाही या कथित कटात सहभागी करून घेतल्याचे तपासात नमूद करण्यात आले आहे. मुंबई गुन्हे शाखेने विशेष लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या न्यायालयात तीन हजारांहून अधिक पानांचे आरोपपत्र दाखल केले आहे.
आयोगाच्या नवी मुंबई कार्यालयात प्रश्नपत्रिकेचा ‘मेटा सेट’ म्हणजेच अंतिम प्रश्नपत्रिका तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रश्नांचा मुख्य संच सांभाळण्याची जबाबदारी विश्वेश्वर नाकते याच्याकडे होती. याच संधीचा फायदा घेत त्याने प्रश्नपेढीतील सुमारे ३०० प्रश्न आपल्या लॅपटॉपवर टाईप केले. त्यानंतर त्यांची प्रिंट काढून आयोगाच्या कार्यालयाच्या पार्किंगमध्ये अवर सचिव अभिजित लेंडवे याच्याकडे दिली. पुढे या प्रश्नांची देवाणघेवाण इतर आरोपींच्या माध्यमातून झाल्याचा आरोप आहे.
या प्रकरणातील पहिल्या आरोपपत्रात विश्वेश्वर नाकते, अभिजित लेंडवे, गोपाळ मराठे, मध्यस्थ प्रवीण पाटील, अमृत पाटील आणि गौरव पाटील या सहा जणांची नावे आहेत. आतापर्यंत या प्रकरणात १३ जणांना अटक करण्यात आली असून, अन्य दोन आरोपी फरार आहेत. उर्वरित आरोपींविरोधात डिसेंबरमध्ये पुरवणी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता आहे.
































































