
पूर्व द्रुतगती महामार्गावरील (ईस्टर्न फ्रीवे) वाहतूक अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी महापालिकेने सुमारे 25 कोटी 15 लाख रुपयांची निविदा काढली आहे. येलो गेट ते चेंबूरदरम्यानच्या सुमारे 17.8 किलोमीटर लांबीच्या फ्रीवेवर विविध वाहतूकविषयक सुविधा उभारणे, बसविणे आणि त्यांची देखभाल करण्याचे काम या निविदेद्वारे करण्यात येणार आहे.
या कामासाठी महापालिकेने 25 कोटी 15 लाख 94 हजार 65 रुपये अंदाजित खर्च निश्चित केला आहे. निविदेसाठी 25 लाख 16 हजार रुपये अनामत रक्कम ठेवावी लागणार आहे. 25 नोव्हेंबरपासून निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक कंत्राटदारांना 9 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने निविदा सादर करता येणार आहेत. 10 डिसेंबर रोजी निविदा उघडण्यात येणार आहेत.
या प्रकल्पांतर्गत फ्रीवेवर थर्मल प्लॅस्टिकच्या साह्याने पांढरे आणि पिवळे रोड मार्किंग करण्यात येणार आहे. तसेच वाहतूक दिशादर्शक आणि सूचना फलक, झेब्रा क्रॉसिंग, रंबलर्स यांसारख्या सुविधांची उभारणी केली जाणार आहे. वाहनचालकांना रस्त्यावरील खुणा आणि सूचना स्पष्टपणे दिसाव्यात, तसेच वेग नियंत्रित ठेवण्यास मदत व्हावी, यासाठी या सुविधांचा उपयोग होणार आहे.
विशेष म्हणजे, फ्रीवेवरील वाहतुकीचा वाढता भार लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांशी चर्चा करण्यात येणार आहे. या मार्गावर सध्या असलेल्या सुविधांचा आढावा घेऊन आणखी कोणत्या उपाययोजना आणि सुविधा आवश्यक आहेत, याची माहिती घेतली जाणार आहे. त्यानुसार वाहतूक सुरक्षेसाठी आवश्यक कामांचा समावेश करण्यात येणार आहे.
महापालिकेच्या रस्ते विभागाच्या नियोजन शाखेमार्फत ही निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यामुळे पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक व्यवस्थापनाला अधिक शिस्तबद्ध स्वरूप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.



























































