
वरळीतील नागरी समस्या तातडीने मार्गी लावा, अशी मागणी शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पालिका आयुक्त अश्विनी भिडे यांच्याकडे केली आहे. आदित्य ठाकरे यांनी आज पालिका आयुक्तांची भेट घेऊन वरळी विधानसभा मतदारसंघातील विविध प्रश्नांसदर्भात सविस्तर चर्चा केली. प्रलंबित प्रश्न तातडीने सोडवा, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली.
वरळीतील रस्ते, खड्डे, पुनर्विकास प्रकल्प याबाबत नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. या समस्यांबाबत आदित्य ठाकरे पालिकेसह म्हाडा आणि एसआरए प्रशासनासोबतही वारंवार बैठका घेऊन पाठपुरावा करीत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी आयुक्तांना या प्रश्नांसदर्भात निवेदन सादर केले. यामध्ये एन. एम. जोशी मार्ग ते मिनर्व्ह रोड, वरळी या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठय़ा प्रमाणात खड्डे पडले आहेत. रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाली आहे. हा रस्ता एनटीसीच्या अखत्यारीत असला तरी नागरिकांची गैरसोय लक्षात घेता या रस्त्याची तातडीने डागडुजी व दुरुस्ती करण्याची मागणी या बैठकीत करण्यात आली. यावेळी आमदार सुनील शिंदे, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर, नगरसेविका आबोली खाडये यांच्यासह शिवसेना नगरसेवक, पदाधिकारी उपस्थित होते.
वरळी, जिजामाता नगर पुनर्विकास प्रकल्पातील संभ्रम दूर करा
मुंबई महापालिकेच्या एसटीपी प्रकल्पासाठी पूर्वी 17,000 चौ.मी. क्षेत्राचे आरक्षण असताना, आता सुमारे 27,000 चौ.मी. क्षेत्राची मागणी करण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये पुनर्विकास प्रकल्पाबाबत संभ्रम व चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी याबाबत वस्तुस्थिती स्पष्ट करून आरक्षणासंदर्भातील संभ्रम दूर करावा व पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी आयुक्तांकडे करण्यात आली.
रस्त्यांची अवस्था सुधारा
वरळी गांधीनगर येथील एसआरए वसाहतीकडे जाणारा पोहोच रस्ता एसआरएच्या अखत्यारीत असल्याने त्याच्या देखभाल-दुरुस्तीत अडचणी येत आहेत. त्यामुळे या रस्त्याचे नियमानुसार पालिकेकडे हस्तांतरण करून त्याच्या दुरुस्तीकडे पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले. वरळी, सुभेदार रामजी आंबेडकर रोड येथील रस्ता रुंदीकरणासाठी, आवश्यक असलेल्या सेटबॅक एरियाचा ताबा घ्यावा व रस्त्याचे काम पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करावा, अशी मागणी केली.























































