मी टीम इंडियामध्ये पुनरागम करण्याचा विचार सोडून दिला! हताश मोहम्मद शमीने मनातली सल बोलून दाखवली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

एकेकाळी हिंदुस्थानला धमाकेदार सुरुवात करून देणारा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी सध्या देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करूनही टीम इंडियामध्ये संधी मिळत नसल्या कारणाने चर्चेत आहे. याच दरम्यान त्याने 6 नोव्हेंबर 2026 कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. मात्र, एकदीवसीय आणि टी-20 क्रिकेटसाठी त्याने स्वत:ला देशासाठी उपलब्ध ठेवले आहे. मात्र, दुसरीकडे त्याने टीम इंडियामध्ये पुनरागम करण्याचा विचार सोडून दिल्याचे स्पष्ट केले आहे. त्याचे संपूर्ण लक्ष आता बंगाल आणि IPL खेळण्यावर असल्याचंही त्याने स्पष्ट केलं आहे.

Cricinfo ने दिलेल्या वृत्तानुसार, टीम इंडियात परतणे, 2027 चा वनडे वर्ल्ड कप आणि 2028 चा टी-20 वर्ल्ड कप याबाबत विचारलेल्या प्रश्नावर शमी म्हणाला, “मी या गोष्टींवर लक्ष केंद्रित करणे सोडून दिले आहे. मी फक्त माझ्या खेळावर लक्ष देत आहे. निवडकर्ते जो काही निर्णय घेतील, तो चांगल्यासाठीच असेल. माझ्या दृष्टीने महत्त्वाचे म्हणजे मी खेळत राहणे, माझी लय टिकवून ठेवणे आणि निदान आयपीएल व माझ्या राज्य संघासाठी खेळत राहणे.” असं शमी म्हणाला.

कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेण्यामागचे कारण स्पष्ट करताना शमी म्हणाला, “मला वाटले की असे करणे योग्य आहे, म्हणून मी तो निर्णय घेतला. मी चांगल्या प्रकारे हालचाल करू शकतो आणि खेळू शकतो, जेणेकरून बिनधास्त व्हाईट बॉल क्रिकेट खेळता येईल. शरीरावर खूप जास्त दबाव येणे चांगले नाही.” 2025 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर शमी एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही आणि प्रज्ञान ओझा यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीही त्याच्या पुनरागमनासाठी उत्सुक नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे आगामी काळात मोहम्मद शमी पुन्हा एकदा टीम इंडियाच्या निळ्या जर्सीत दिसणार का, याची चाहत्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.